Omicron : ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना हा सर्वसाधारण आजार बनेल; तज्ज्ञांचं मत
डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अगदीच कमी असल्याचं दिसून येतंय.
मुंबई : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोविड रुग्णसंख्या वाढीचे उच्चांक मोडले. मात्र याच ओमायक्रॉनमुळे कोविड आजार हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे व्हायला मदत करेल असं तज्ज्ञांचं मत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे झालेल्या मृत्युच्या थैमानाशी तुलना करता ओमायक्रॉन हा सौम्य लक्षणी असल्याचं दिसून आलंय.त्यामुळे कोविडच्या महाभयंकर संकटाची जीवघेणी गंभीरता ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कमी होतेय असं तज्ज्ञांकडून निरीक्षण मांडलं जातंय.
डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटची तुलना केली तर ओमायक्रॉनमुळे बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची फारशी वेळ आली नाही. तसंच तज्ञांच्या मते, ओमायक्रॉन विषाणू फुफ्फुसांना डेल्टाप्रमाणे हाणी पोहोचवू शकला नाही. ओमायक्रॉन हा विषाणू कोरोनाला एक सर्वसामान्य आजारांप्रमाणे व्हायला कारणीभूत ठरु शकेल. जितक्या झपाट्यानं सध्या रुग्णसंख्या वाढ दिसली, तितक्याच झपाट्यानं ती खाली येईल असे भाकीत देखील वर्तवले गेले आहे.
जग जितकं कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटला घाबरलं होतं, तितकी भीती ओमिक्रॉनच्या फैलावानंतर दिसत नाही. कोरोना रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड सध्या मोडले जात आहेत, पण तरीही कोणत्याही देशानं पूर्ण लॉकडाऊन केलेलं नाही. कारण, बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये मोठी लक्षणं दिसत नाहीय. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीच्या आलेखानं आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली असली, तरी बहुतांश देशांचे व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
महाराष्ट्रात सुद्धा रुग्णवाढीचा आकडा हा 40 हजारांवर गेल्यानंतरही अद्याप पूर्ण लॉकडाऊनबाबत सरकारचा कोणताही विचार नाही. सध्याचा विचार करता मुंबईत 38 हजार बेडपैकी केवळ 6 हजार बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत दर दिवसाला रुग्णालयातून बरे होऊन घरी परत जाणाऱ्यांचं प्रमाण हे 90 टक्के इतकं आहे. काही दिवसांपूर्वी 20 हजारांची रुग्णसंख्या पार झालेल्या मुंबईत आता कोरोनाचा डाऊनफॉल सुरु झालेला दिसतो.सध्या मुंबईत दर दिवसाला 11 हजार रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी नऊ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
मुंबईतल्या बहुतांश रुग्णांना सर्दी-खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. या रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी आहे. ही उदाहरणं कोरोनाची दाहकता कमी झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे एकतर कोरोना या पुढच्या काळात साधारण सर्दी-पडश्यासारखा काही काळ आपल्या सोबत राहिल किंवा मग लसीच्या प्रभावामुळे त्याचा कायमचा खात्मा होईल.
महत्त्वाच्या बातम्या :