(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News Update : पालघरमध्ये रोहयो मजूर मजुरीपासून वंचित , तहसील कार्यालयासमोर होळी पेटवून केला सरकारचा निषेध
Palghar News Update : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील मजुरांना मजुरी न मिळाल्यामुळे मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने होळी पेटवून सरकारचा निषेध केला आहे.
Palghar News Update : रोजगाराची संजीवनी समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांना गेल्या एक महिन्यांपासून मजुरी मिळाली नाही. त्यामुळे ऐन होळी सणाच्या वेळी शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजुरी न मिळाल्यामुळे मजुरांमध्ये सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने होळी पेटवून सरकारचा निषेध केला आहे. तसेच येत्या 21 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर सरकारच्या नावाने शिमगा आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिला आहे.
होळी हा राज्यासह पालघर जिल्ह्यातील प्रमुख सण आहे. त्यामुळे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, मजुरीच मिळाली नसल्यामुळे जिल्ह्यातील मजूर होळीचा सण कसा साजरा करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना मागील एक महिन्यापासून मजूरी मिळाली नाही. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च पर्यंतची पालघर जिल्ह्यातील प्रलंबित असलेली 2,090 FTO ची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा झालेली नाही. यापैकी मोखाडा तालुक्यात 521 FTO बँकेकडून प्रोसेस होणे प्रलंबित आहे. शिवाय जिल्ह्यातील रोजगार सेवक देखील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे "मजुरांच्या हक्काचे पैसे त्यांना सणासुदीच्या काळात मिळत नसतील तर मजुरांनी काय उपाशी मारायचे का ?" असा संतप्त सवाल श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी उपस्थित केला आहे.
मजुरांना मजुरी न मिळाल्याच्या निषेधार्थ मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर होळी पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला. शिवाय "येत्या 21 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर सरकारच्या नावाने शिमगा आंदोलन करणार" असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. "प्रचलित परंपरेनुसार होळीच्या सणाला नाच- गाणी साजरा करत पोसत् म्हणजे वर्गणी (पैसे) मागण्याची परंपरा आहे. त्या परंपरे प्रमाणे आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर पोसत् मागून आमचा पारंपरिक होळीचा सण साजरा करू" असे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील रोहयो मजुरांच्या प्रलंबित मजुरीच्या प्रश्नाचा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा, राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी आढावा घेतला आहे. मजुरांना तातडीने हक्काची मजुरी अदा करण्याच्या सूचना पंडीत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा उप जिल्हाधिकारी (रोहयो) सुरेंद्र नवले यांनी या योजनेचे राज्याच्या आयुक्तांना तातडीने मजुरांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्याबाबत विनंती केली आहे.
मोखाडा येथील आंदोलनामध्ये श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष राम भाऊ वारणा, सरचिटणीस विजय भाऊ जाधव, तालुका अध्यक्ष पांडु भाऊ मालक, तालुका सचिव ईश्वर बांबरे यांच्यासह मोठ्या संख्येने मजूर, कार्येकर्ते आणि सभासद सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या