तुळजापुरात प्रवेशबंदी; आधार कार्डशिवाय कोणालाही प्रवेश नाही, शहरात कडेकोट बंदोबस्त
पोलिसांनी मुख्य महाद्वार आणि भाविक मार्गांवरती कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे.तुळजापुरच्या इतिहासात प्रथमच दर्शनासाठी भाविकांची गर्दी नाही.
तुळजापुर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. अशातच ऐन नवरात्रोत्सवात कोरोनामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने तुळजापुरात येणारे सर्व प्रवेश रोखले आहेत. तुळजापूर शहरात येणारे चार मुख्य रस्ते आहेत आणि चारही रस्त्यांवरती मुख्यभागी पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यावर प्रवेश बंद असा फलक लावला आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर शहराच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही, असे तीन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जे तुळजापूरचे रहिवासी आहेत, त्यांना जर शहरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे. त्यांचे आधार कार्ड तपासल्याशिवाय शहरात प्रवेश देण्यात येणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनाही या काळात तुळजापुरात प्रवेश मिळणार नाही. एवढेच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील नागरिकांनाही उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही, असे प्रशासनाने सांगितले होते आणि आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात आहे.
घटस्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार निर्मनुष्य आहे. मंदिर परिसरातील दुकाने उघडी आहेत. पण तिथे खरेदी करायला कोणीही नाही. अशी परिस्थिती तुळजापूरच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाली आहे, असे काही वयोवृध्द लोकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात किमान 15 लाख भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनाच्या रस्त्यांवर भली मोठी रांग असते. पण आज या रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला नाही.
राज्यभर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह अनेकांनी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी या आधीच राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारनेही यावर सकारात्मक विचार करत असल्याचं सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Navratri 2020 : आई तुळजाभवानीचं दर्शन घ्या घरबसल्या, 24 तास लाईव्ह, इथं घ्या दर्शन