![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.
![जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती Nepal bus mishap 14 drowned from Jalgaon and two officers to go to Nepal Devendra Fadnavis tweet and pray homage जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/23/22c89e94a909e306da1c76471b4fac7e17244075985221002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असेही फडणवीसांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल 40 ते 41 प्रवासी असल्याचे समजते.
आम्ही तिथल्या यंत्रणांच्या संपर्कात - अनिल पाटील
नेपाळमधील अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केली. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळात आहे. 41 भाविक बसमध्ये होते. त्यातील 14 जण ठार झाले आहेत. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात आहोत.
अपघातात 14 जणांचा मृत्यू
अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच, त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील भाविकांनी घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)