मी दिलेला दाखला खराच, समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली : नवाब मलिक
Nawab Malik vs Sameer Wankhede : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा दावा केला आहे.
Nawab Malik vs Sameer Wankhede : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा दावा केला आहे. काल ट्विटरवर जन्माच्या दाखल्याचं प्रमाणपत्र प्रसिद्ध केलं होत, त्यामधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. मी काही हिंदू-मुस्लीमचा मुद्दा घेऊन प्रकरण पुढे आणत नाही. आर्यन खान मुस्लीम असल्यामुळे नवाब मलिक या लढाईत उतरल्याचं भाजप सतत आरोप करत आहे. पण माझ्या 35 वर्षांच्या राजकारणात मी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. हे लोकांना चांगलं माहित आहे. वानखेडे यांनी एका मागासवर्गीय समाजातील मुलाची नोकरी खाल्ली आहे. त्यासाठी खोटी प्रमाणपत्रं सादर केली आहेत. मी आजही माझ्या दाव्यावर ठाम आहे. समीर वानखेडे यांचा मी दिलेला जन्माचा दाखला खरा आहे. त्यावर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आहे. वानखेडेंच्या बहिणीचं सर्टिफिकेट ऑनलाइन मिळतेय. मात्र हे सर्टिफिकेट ऑनलाइन मिळत नाही. आम्ही रजिस्टर चेक केले. दीड महिने आम्ही हा कागद शोधत होतो. तेव्हा हे स्कॅन डॉक्युमेंट मिळालं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.
ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मुंबईत स्व. झायदा खान यांच्यासोबत लग्न केलं. ते दाऊद खान बनले. दोन मुलांचा जन्म झाला. पूर्ण कुटुंब मुस्लीमाप्रमाणे राहात होतं. हे सत्य आहे. वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या साह्यानं त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा आधिकार घेतला. याबाबत विविध मागासवर्गीय संघटना माझ्या संपर्कात आहेत. सर्व जातवैधता समितीसमोर तक्रार दाखल करणार आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. आमची लढाई एनसीबीबरोबर नाही. मागील 35 वर्षांपासून एनसीबीनं देशात चांगलं काम केलं आहे. याआधी कधीही त्यांच्यावर कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत, असेही नवाब मलिक म्हणाले. मी समोर आणलेला दाखला खोटा असल्याचं समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. जर मी दिलेला दाखला खोटा असेल तर खरा दाखला वानखेडें यांनी प्रसिद्ध करावा. समीर वानखेडे यांनी आपलं जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करावं. अन्यथा ज्याप्रमाणे जन्मचा दाखला काढला तसाच जातीचा दाखलाही काढला जाईल, असेही मलिक म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र मिळालं आहे. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे, असं नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं आहे. यामध्ये 26 केसेसचा उल्लेख केला गेलाय. कशाप्रकारे पैसे वसूल केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे, असे मलिक म्हणाले. दोन दिवसांपूर्वी परभणी दौऱ्यावर जात असताना पत्र मिळालं. हे पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. तसेच समीर वानखेडे यांची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या कमिटालाही हे पत्र पाठवलं जाणार आहे. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असेही मलिक यांनी सांगितलं.