(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navneet Rana : नवनीत राणा आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, राणांच्या तक्रारीवर संसदेची विशेषाधिकार समिती चौकशी करणार
खासदार नवनीत राणा आज संध्याकाळी 5.30 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र सरकारने आपल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याची तक्रार त्यांनी केली होती.
नवी दिल्ली: खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारविरोधात केलेल्या तक्रारीवर 23 मे रोजी संसदेच्या विशेषाधिकार समिती सुनावणी करणार आहे. यासाठी समितीने खासदार नवनीत राणा यांनी चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा हे आज संध्याकाळी 5.30 वाजता लोकसभा सभापतींची भेट घेणार आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. तुरुंगात असताना आपल्याला वाईट वागणूक देण्यात आली, आपल्याला पाणी देण्यात आलं नव्हतं तसेच बाथरुमचा वापरही करु दिला नव्हता अशी तक्रार नवनीत राणा यांनी केली होती. या तक्रारीची दखल लोकसभा अध्यक्षांनी घेतली असून याची संसदेच्या विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
तुमचा जामीन रद्द का करू नये, न्यायालयाचा राणांना सवाल
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. यामध्ये माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अटींचा भंग केल्याची तक्रार सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात केली. त्यावर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. तुमचा रद्द का करू नये याचे उत्तर न्यायालयाने राणा दाम्पत्याकडे मागितले आहे.
टीकेला उत्तर देणं हा घटनात्मक अधिकार
न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावर राणा दाम्पत्यांच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे. टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक आधिकार, आम्ही कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Navneet Rana Bail : जामीन रद्द का करू नये? राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस
- टीकेला उत्तर देणं आमचा घटनात्मक अधिकार, कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केलं नाही; कोर्टाच्या निर्णयानंतर राणा दाम्पत्याची प्रतिक्रिया
- Shiv Sena : नवनीत राणांचे MIR करताना फोटो, व्हिडिओ शुटींग व्हायरल; शिवसेनेचा आक्षेप, गाठलं लीलावती रुग्णालय