Shiv Sena : नवनीत राणांचे MIR करताना फोटो, व्हिडिओ शुटींग व्हायरल; शिवसेनेचा आक्षेप, गाठलं लीलावती रुग्णालय
Shiv Sena Vs Navneet Rana : नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे.
Shiv Sena Vs Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयात एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना तिथली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास चांगलचं धारेवर धरलं आहे. नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी हॉस्पिटलने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आलीय. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.
नवनीत राणांनी केले उपचाराचे नाटक, किशोरी पेडणेकरांचे आरोप
स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय, अशी टीका ही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
नवनीत राणांच्या उपचारांंबाबत शंका, शिवसेनेकडून रुग्णालय प्रशासनाला विचारण्यात आलेले प्रश्न
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काल लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असतानाची व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं आहे. नवनीत राणांविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून त्यांच्या उपचारांविषयी रुग्णालय प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
-सेलिब्रिटींसाठी वेगळा न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय का?
-स्पॉंडिलायटीस असताना नवनीत यांनी उशी कशी वापरली?
-रुग्णालयात राणांचं शुटींग कसं झालं?
-नवनीत राणा यांचा MRI झाला की नाही?
-एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहचलास कसा?
-रुग्णांसोबत एकालाच परवानगी असताना राणांसोबत चार जण कसे?
-डॉक्टरांनी MRI चा रिपोर्ट सादर करावा.
Maharashtra | Amravati MP Navneet Rana undergoes an MRI scan and a full body checkup at Lilavati Hospital in Mumbai after she complained of pain in the chest, neck, and different parts of the body as well as spondylitis.
— ANI (@ANI) May 7, 2022
(Pics shared by the MP's office) pic.twitter.com/4xmzQANpXe
राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन तक्रार करणार
राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातला वाद पुन्हा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कारण जेलमधून बाहेर आलेलं राणा दाम्पत्य आज दिल्लीत जाऊन तक्रार करणार आहेत. तर दुसरीकडे बीएमसीचं पथक आज नवनीत राणा यांच्या मुंबईतील खारमधील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरात झालेल्या कथित बेकायदा बांधकामाची तपासणी करण्याची शक्यता आहे. नवनीत आणि रवी राणा आज सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. तिथं ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात आणि जेलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार करणार आहेत. बीएमसीचं पथक आज पुन्हा एकदा राणा यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. याआधी दोन वेळा बीएमसीचे अधिकारी राणांच्या घरी बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते, पण घर बंद असल्यानं नोटीस देऊन ते परतले.
नेमकं प्रकरण काय?
सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :