नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या, अन्यथा मंत्रालयावर भव्य मोर्चाचा काढणार, शरद पवारांच्या खासदाराचा इशारा
नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
Navi Mumbai : नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली आहे. या नामांतरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव मंजूर करुन तो केंद्र सरकारकडे पाठवला असतानाही, तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे भूमिपुत्र समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत मुंबईतून न हटण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील या मागणीसाठी 22 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 16 तारखेपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारली. परिणामी हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. असे असले तरी 25 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू होणाऱ्या व्यावसायिक (कॉमर्शियल) लँडिंगच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात येणार आहे. हा निषेध पाच जिल्ह्यांतील प्रत्येक गाव, वस्ती व झोपडपट्टी परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
आंदोलन विमानतळावर न करता थेट महाराष्ट्र मंत्रालयावर नेण्यात येणार
हे संपूर्ण आंदोलन खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, 22तारखेचे आंदोलन पुढे ढकलण्यात आले असले तरी आंदोलनाची दिशा बदलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता हे आंदोलन विमानतळावर न करता थेट महाराष्ट्र मंत्रालयावर नेण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत मुंबईतून न हटण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले. दिबा पाटील यांच्या नावाचा सन्मान होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या नावाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील भूमिपुत्रांनी दि.बा. पाटील यांच्या नावासाठी संघर्ष केला.























