National Red Rose Day: गुलाब लागवडीत भारत जगात आघाडीवर, परदेशातही भारतीय गुलाबाची दरवळ
आज राष्ट्रीय लाल गुलाब दिवस (National Red Rose Day) आहे. या निमित्ताने आपण भारतातील कोणत्या राज्यात लाल गुलाबाची सर्वाधिक लागवड केली जाते, यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत.
National Red Rose Day: गुलाब (Rose) हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लोक अनेकदा त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भेट म्हणून गुलाबाचे फुल देतात. त्यामुळं गुलाबाच्या फुलांना विशेष महत्व आहे. आज राष्ट्रीय लाल गुलाब दिवस (National Red Rose Day) आहे. या निमित्ताने आपण भारतातील कोणत्या राज्यात लाल गुलाबाची सर्वाधिक लागवड केली जाते, यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत.
गुलाब शेती करणाऱ्यांना मोठा फायदा
गुलाब लागवडीच्या बाबतीत भारताचा जगात अव्वल क्रमांक लागतो. गुलाबाच्या माध्यमातून अनेक उत्पादने तयार केली जातात. ज्यामध्ये गुलाबपाणी, गुलकंदपासून ते कन्नौज आणि हसयानच्या प्रसिद्ध परफ्यूमपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. याशिवाय अशी अनेक उत्पादने आहेत, जी गुलाबापासून बनवली जातात. त्यातून शेती करणाऱ्यांना मोठा नफा मिळतो.
देशात सर्वाधिक गुलाबाची लागवड कर्नाटकमध्ये
देशात सर्वाधिक गुलाबाची लागवड ही कर्नाटक राज्यात केली जाते. कर्नाटक अव्वल स्थानावर आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) च्या अहवालानुसार, कर्नाटकाने 2022 मध्ये फुलांचे उत्पादन दुप्पट करून 1,71,880 टन केले, जे 2018 मधील 76,910 टन होते. बंगळुरूचा डच गुलाब खूप लोकप्रिय असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशभरातून परदेशात जाणाऱ्या गुलाबांमध्ये कर्नाटकचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे याच्या कामाशी संबंधित लोकांनाही खूप फायदा होतो. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होते.
गुलाबाची लागवड करताना काय काळजी घ्यावी?
गुलाब लागवडीसाठी 15 ते 28 अंश तापमान चांगले असते. त्याच्या लागवडीसाठी, मातीचे pH मूल्य 6 ते 7.5 दरम्यान असावे. गुलाब वाढवण्यासाठी वालुकामय चिकणमाती उत्तम आहे. ओळींमध्ये लागवड करा, रोपांमध्ये 2-3 फूट अंतर ठेवा. गुलाबासाठी पाण्याचे योग्य नियोजन करा. जेव्हा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या चमकदार रंगाच्या असतात तेव्हा त्यांना कापण्याची ही योग्य वेळ असते.
दरवर्षी गुलाबाच्या फुलातून करोडो रुपयांची उलाढाल
दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड केली जाते. परदेशातही मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात होते. दरवर्षी गुलाबाच्या फुलातून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. देशातील अनेक राज्यात गुलाबाची लागवड केली जाते. मात्र, कर्नाटक हे राज्य गुलाबाच्या लागवडीत आघाडीवर आहे. कमी काळात अधिक नफा मिळत असल्यामुळं शेतकरी अलिकडच्या काळात गुलाब शेतीचा पर्याय निवडत आहेत. विशेषत: तरुण शेतकरी गुलाब शेतीचा प्रयोग करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
गुलाबानं आणला तरुणाच्या आयुष्यात 'सुगंध', आज करतोय लाखो रुपयांची कमाई