RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्याची घोषणा केली. रेपो रेट सध्या 6.25 टक्क्यांवर आला आहे.

RBI MPC Meeting Update नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर पत धोरण जाहीर केलं. संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट 6.50 वरुन 25 बेसिस पॉईंट कमी करुन 6.25 टक्के केलं आहे. याचा बँकिंग क्षेत्राकडून होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक आणि गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व्याज दरात कपातीबाबत घोषणा करु शकते. आरबीआयच्या रेपो रेटच्या कपातीनंतर गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
कर कपातीनंतर ईएमआय कमी होणार?
व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अशवनी राणा यांनी आरबीआयच्या रेपो रेटमध्ये कपाती संदर्भात भाष्य केलं. अर्थसंकल्पातील करसवलतीनंतर मध्यमवर्गाला आरबीआयकडून स्वस्त कर्जाची भेट मिळाली आहे. आरबीआयनं पाच वर्षानंतर रेपो रेट 0.25 अकांनी कमी करुन ईएमआय भरणाऱ्यांना दिलासा आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री आणि दिल्ली चांदणी चौक लोकसभेचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी 25 बेसिस पॉईंटची कपात करण्याच्या आरबीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं. यामुळं व्यापार आणि ग्राहकांना कर्ज घेण्याच्या खर्चात कमी येईल. गृह आणि व्यवसाय कर्ज घेतल्यास त्यातून लोकांना त्यातून दिलासा मिळेल. परिणामी नागरिकांच्या क्रयशस्कतीत वाढ होईल. यामुळं बाजारात भांडवल वाढेल. व्यावसायिक गुंतवणूक वाढेल, आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असं खंडेलवाल म्हणाले.
आरबीआयच्या रेपो रेटच्या दर कपातीच्या निर्णयानं गृह कर्जाच्या काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घ्या.
25 लाखांचं कर्ज असल्यास किती ईएमआय द्यावा लागेल?
समजा एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज 25 लाख रुपयांचं आहे. सध्या 8.75 टक्के व्याज दरानं त्याला दरमहा 22093 रुपये ईएमआय भरावा लागतोय. तर, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट कमी केल्यानं व्याज दर 8.50 टक्क्यांवर आल्यास ईएमआय म्हणून 21696 रुपये द्यावा लागेल. म्हणजेच एका ईएमआयमध्ये त्याचे 403 रुपये वाचतील. म्हणजेच एका वर्षात 4836 रुपये वाचणार आहेत.
50 लाख रुपयांचं गृह कर्ज असल्यास किती रुपये वाचणार?
जर एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज 50 लाख रुपयांचं असल्यास 9 टक्के व्याज दरानं वर्षांसाठी कर्ज घेतलं असल्यास त्याच्या कर्जाचा हप्ता 44986 रुपये होईल. रेपो रेट कपातीनंतर व्याज दर 8.75 टक्क्यांवर आल्यास त्याला ईएमआय 44186 रुपये भरावा लागेल. म्हणजेच दरमहा त्याचे 800 रुपये वाचतील.एका वर्षात ईएमआयमधून त्याचे 9600 रुपये वाचतील.
1 कोटींचं गृहकर्ज असल्यास किती एका वर्षात किती रक्कम वाचणार?
एखाद्या व्यक्तीनं 1 कोटी रुपयांचं गृहकर्ज 8.75 टक्के दरानं 20 वर्षांसाठी काढलं असल्यास त्याला दरमहा कर्जाचा हप्ता 88371 रुपये द्यावा लागतो. मात्र, व्याज दरात कपात होऊन व्याज दर 8.50 टक्के झाल्यास ईएमआयची रक्कम 1589 रुपयांनी कमी होईल. संबंधित व्यक्तीला 86782 रुपये ईएमआय दरमहा भरावा लागेल. वार्षिक 19068 रुपये वाचतील.
इतर बातम्या :

























