एक्स्प्लोर
नोटाबंदी ही क्रांती नाही तर बेबंदशाही आहे: नारायण राणे
मुंबई: 'नोटाबंदी ही क्रांती नाही तर बेबंदशाही आहे. नोटाबंदीच्या निर्णयानं आज कुणीही समाधानी नाही.' अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली. नोटाबंदीनंतरचे 50 दिवस याविषयी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत नारायण राणे यांनी मोदी सरकार टीकास्त्र सोडलं आहे.
'नोटाबंदीत लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा'
'नोटाबंदीच्या या निर्णयामुळे उद्योजक वैतागले आहेत. काही मोजके उद्योजक सोडले तर देशातील अनेक उद्योजकांना बराच त्रास झाला आहे. नोटाबंदीत लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आली. जर सरकारच्या एखाद्या निर्णयाचा लोकांना त्रास होत असेल तर त्यावर टीका केलीच पाहिजे. नोटाबंदीनंतर सुरुवातीला काय होत आहे हे कुणालाच कळत नव्हतं. पण जेव्हा लोकांना त्रास झाला त्यानंतर काँग्रेसनं या निर्णयावर टीका करणं सुरु केलं.' असं म्हणत राणेंनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.
'नोटाबंदी हा काळा पैसा संपवण्याचा मार्ग नाही'
'नोटाबंदी हा काळा पैसा संपवण्याचा मार्ग नाही. आतापर्यंत एकही काळा पैसा उघड झालेला नाही. काळा पैसा, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्याकडे प्रशासनाच्या मदतीनं यंत्रणा आहे. पण त्याचा वापरच झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये किती प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे सर्वांना माहिती आहे.' असं म्हणत राणेंनी फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.
'पूर्वतयारी नसताना कॅशलेसचा अट्टाहास चुकीचा'
'कोणतीही पूर्वतयारी नसताना कॅशलेसचा अट्टाहास करणं चुकीचं आहे. कॅशलेससाठी सर्वात आधी आपल्याकडे त्या पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण कॅशलेसबाबत जे मोदी बोलत आहेत तसं अजिबात होऊ शकत नाही. आज अमेरिकेतही 46 टक्के रोखीनं व्यवहार होतात. ऑस्ट्रियामध्येही 60 टक्के रोखीनं व्यवहार होतात. त्यामुळे भारतात नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी त्याची तयारी करणं गरजेचं होतं. अजूनही आपली बँकिग व्यवस्था कॅशलेससाठी पूर्णपणे तयार नाही.' असंही राणे म्हणाले.
'स्वत:च्या अंगावर आलं की, मोदी काँग्रेसवर खापर फोडतात'
'एखाद्या गोष्टी आपल्यावर उलटायला लागल्या की मोदी आधीच्या सरकारवर त्या गोष्टी ढकलून मोकळे होतात. काही दिवसांपूर्वीच मोदी आणि राज्य सरकारनं 2 लाख 17 हजार कोटीच्या विकास कामाची उद्घाटनं केली. पण राज्य सरकारकडे पैसा आहे कुठे? राज्य सरकारच कर्जाची मागणी करत आहे. त्यामुळे या सरकारकडे कोणताही कार्यक्रम नाही.' अशीही टीका राणेंनी केली.
'...तर लोक रस्त्यावर नक्कीच उतरतील'
'नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकं आज शांत आहेत. पण उद्या हाच जनक्षोभ रस्तावर येईल. लोकांना त्रास होतो आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे आज नाही तर उद्या लोक याविरोधात रस्त्यावर नक्कीच उतरतील.' असंही राणे म्हणाले.
'मलाही नोटाबंदीचा त्रास झाला!'
'सामान्य नागरिकांप्रमाणे मलाही या निर्णयाचा त्रास झालाच. 8 नोव्हेंबरला मोदींचं भाषण ऐकलं. 9 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता ऑफिससाठी निघालो. माझ्याकडे तेव्हा 30 ते 40 हजार रुपयांची रोकड होती. पण त्या सगळ्या 500 आणि 1000च्या नोटा होत्या. बांद्रापर्यंत आल्यावर मला लक्षात आलं की, या नोटांचा आज काही उपयोग होणार नाही. त्यामुळे मी पुन्हा घरी गेलो. म्हटलं आज बाहेर न गेलेलंच बरं... दुसऱ्यादिवशी बँकेतून फक्त24 हजार मिळाले. त्यामुळे माझा हाच प्रश्न आहे की, आपलेच पैसे खर्च करण्यावर बंधनं घालणारे तुम्ही कोण?' असं म्हणत राणेंनी नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement