नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, तर चिखलीकरांसह हेमंत पाटलांची मोर्चेबांधणी, महापालिकेत कोण उधळणार गुलाल?
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नांदेडमध्ये देखील जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.
Nanded Municipal Corporation : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये देखील जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. जाणू घेऊयात नांदेड महानगरपालिके संदर्भात सविस्तर माहिती.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेची स्थापना 1996-97 साली झालेली आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता कायम आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. कारण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नांदेडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळं यावेळच्या महापालिका निवडणुकीत नेमकं काय होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान,
2017 साली काँग्रेसने 81 पैकी तब्बल 73 जागा जिंकल्या होत्या
2017 साली झालेल्या निवडणूकीत 60 टक्के मतदान झालं होतं. यावेळी भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं होतं. पण अशोक चव्हाणांनी भाजपची संपूर्ण हवा काढून टाकली होती. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. 2017 साली झालल्या खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला. काँग्रेने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून, मोठा विजय मिळवला. स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, 2022 मध्ये मनपाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकराज लागू झाले. त्यानंतर आता सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्याच्या रणधुमाळीत अनेक पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करत असले, तरी राज्य पातळीवरील निर्णयांवर अंतिम समीकरणे अवलंबून असणार आहेत.
2017 सालचा नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल
काँग्रेस - 73
भाजप - 06
एमआयएम - 00
शिवसेना - 01
अपक्ष/इतर - 01
2017 च्या निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण तरीही भाजपचा पराभव झाला. भाजपने आपल्या 10 मंत्री-नेत्यांच्या तोफा नांदेडमध्ये डेरेदाखल केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यासारख्या नेत्यांची फौज नांदेडमध्ये दाखल झाले होते. मात्र एकट्या अशोक चव्हाणांनी या सर्वांचा सुपडासाफ करच नांदेडमध्ये आपणच सम्राट असल्याचं दाखवून दिलं होतं. भाजपला अवघ्या 6 जागा मिळाल्या होत्या. इतक्या नेत्यांची फौज लावूनही नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपला ‘अशोकचक्र’ भेदता आलं नाही.
राष्ट्रवादीसमोर खाते खोलण्याचं आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस आता दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीसमोर मनपा निवडणुकीत भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. सध्या अशोकराव चव्हाण भाजपमध्ये असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही खासदारांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत नांदेड मनपावर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनपावर भगवा फडकविण्यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंद बोंढारकर यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यापुढे मनपात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक पुन्हा सुरू करण्याचे आव्हान असणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडं सर्वाचं लक्ष
महापालिका क्षेत्रात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि मनसे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. काँग्रेसकडून स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली जात असताना, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. यावेळी काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, नांदेड महापालिकेत महायुती होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं भाजपला आव्हान देण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इच्छुकांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच प्रभाग पिंजून काढले
मतदारांना वळवताना उमेदवारांची परीक्षा प्राप्त अर्जांची छाननी झाल्यावर महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. असे असले तरी काही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा निर्धार केलेल्या अनेक इच्छुकांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच प्रभाग पिंजून काढले आहेत. लोकप्रतिनिधी असताना प्रभागात न फिरकणारे अनेक चेहरे इतिहास विसरुन मतदारांना गळ घालताना दिसून येत आहेत. मात्र, अतिशय चाणाक्ष असलेला मतदारराजा इच्छुकांची कधी फिरकी तर कधी नेतेमंडळींप्रमाणे आश्वासन देत मतदान तुम्हालाच करणार असल्याचे सांगत उमेदवारांना भिजवत ठेवत आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात - 23 डिसेंबर 2025
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - 30 डिसेंबर 2025
- अर्जांची छाननी - 31 डिसेंबर 2025
- अर्ज मागे घेण्याची मुदत - 2 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी 2026
- मतदान - 15 जानेवारी 2026
- मतमोजणी अर्थात निकाल - 16 जानेवारी 2026
महत्वाच्या बातम्या:
























