लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी
तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार आहे. जाणून घेऊता लातूर महानगरपालिकेसंदर्भात सविस्तर माहिती.
Latur Municipal Corporation News : तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार आहे. लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांतील 70 जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यामुळे शहरात राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांतील कार्यकर्ते निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. काँग्रेस आणि भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
काँग्रेस आणि भाजपाला दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह वंचित बहुजन आघाडी आव्हान
लातूर महानगरपालिकेच्या आतापर्यंत दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे प्रमुख पक्ष मैदानात होते. दोन्ही निवडणुका सर्वच पक्षांनी स्वबळावर लढल्या होत्या. या निवडणुकीत पक्षांतर्गत फाटाफुटीमुळे राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत. काँग्रेस आणि भाजपाला दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी आणि एमआयएम या पक्षांचे आव्हान असणार आहे.
वरिष्ठ पातळीवरून महापालिका निवडणुकीत आघाडी व महायुती होण्याचे संकेत दिले जात असले तरी लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र कितपत येतील, हा प्रश्न कायम आहे. त्याचप्रमाणे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील जागावाटपावरही महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी, एएमआयएमनेही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मागणीचे अर्जही भरून घेण्यात आले आहेत. काही प्रभागात नवीन इच्छुकांची संख्या वाढली असल्याचे पाहून पक्षांतरही होत आहेत.
लातूर महानगरपालिकेची पहिली निवडणूक – 2012
25 ऑक्टोबर 2011 रोजी लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी पहिली महापालिका निवडणूक पार पडली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 51 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. मुख्य प्रतिस्पर्धी भाजपाला या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने 13 जागा जिंकत चांगली लढत दिली होती. शिवसेनेचे तीन तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दोन नगरसेवक विजयी झाले होते.
लातूर महानगरपालिकेची दुसरी निवडणूक - 2017
दुसरी निवडणूक 2017 मध्ये पार पडली. 2014 मध्ये राज्य व देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राजकीय वातावरण बदलले होते. त्याचा थेट फायदा लातूर भाजपाला झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये सत्तांतर झाले. भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 36 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना खाते उघडता आले नव्हते.
पालिकेच्या निवडणुकी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महानगरपालिका निवडणूक जरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होत असली तरी त्याची प्रतिष्ठा मात्र राज्य व जिल्हा पातळीवरील दिग्गज नेत्यांची लागली आहे. काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख, माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार धीरज देशमुख यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या विरोधात भाजपाकडून माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, शहर भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर तसेच माजी मंत्री व भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर हे दिग्गज मैदानात आहेत. त्यामुळे शहरात चुरशीचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
2017 मध्ये रिंगणात उतरलेल्या 396 उमेदवारांपैकी 54 उमेदवार करोडपती होते
सर्वाधिक संपत्तीची नोंद असलेले उमेदवार
20 डिसेंबरपूर्वी बुथनिहाय मतदार संख्या निश्चित केली जाणार
इच्छुक उमेदवारांची संख्या भाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक
इच्छुक उमेदवारांची संख्या भाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, आप, एमआयएमसह इतर पक्षांचीही तयारी दिसून येत आहे. सर्वांनीच उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर वाढविला आहे. बुधवारी दिवसभर काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांची गर्दी होती. जवळपास 50 टक्के इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
उमेदवारीसाठी चढाओढ, एका-एका प्रभागात एका जागेसाठी पाच ते दहा जणांनी केला दावा
महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे. एका-एका प्रभागात एका जागेसाठी पाच ते दहा जणांनी दावा केला आहे. त्यामुळे नेत्यांना उमेदवार देत असताना कसरत करावी लागत आहे. ज्यांनी पक्षाकडे रितसर शुल्क भरून अर्ज दिला, ज्यांनी मुलाखत दिली, त्यांनाच उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल की, ऐनवेळी कोणी तरी वजनदार म्हणून ‘चर्चित चेहरा’ म्हणून तिकीट घेऊन जाईल की काय, अशी भीतीही उमेदवारांना आहे.
लातूर शहर भाजपाच्या वतीने अर्ज स्वीकृतीस प्रारंभ
आगामी लातूर महापालिका निवडणूक भाजपाकडून लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून लातूर शहर भाजपाच्या वतीने अर्ज स्वीकृतीस प्रारंभ करण्यात आला आहे. लातुरातील भाजपच्या कार्यालयात या प्रक्रियेसाठी इच्छुकांनी मोठी भाऊगर्दी केलेली पाहण्यास मिळत आहे. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी आत्तापर्यंत 650 पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत. प्रदेश भाजपकडून आलेल्या सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरु असून, सर्व इच्छुकांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपने दिली.
तिसऱ्यांदा महानगरपालिकेची निवडणूक : प्रभागनिहाय चित्र
लातूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शहरातील 18 प्रभागांमधील एकूण 3 लाख 21 हजार 354 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 प्रभागांतील 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
प्रभागनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे
प्रभाग 1 : 20,310 मतदार
प्रभाग 2 : 18,626 मतदार
प्रभाग 3 : 17,820 मतदार
प्रभाग 4 : 20,248 मतदार
प्रभाग 5 : 16,986 मतदार
प्रभाग 6 : 17,085 मतदार
प्रभाग 7 : 17,986 मतदार
प्रभाग 8 : 20,594 मतदार
प्रभाग 9 : 20,553 मतदार
प्रभाग 10 : 19,240 मतदार
प्रभाग 11 : 17,543 मतदार
प्रभाग 12 : 19,329 मतदार
प्रभाग 13 : 17,771 मतदार
प्रभाग 14 : 16,688 मतदार
प्रभाग 15 : 17,841 मतदार
प्रभाग 16 : 15,427 मतदार
प्रभाग 17 : 14,634 मतदार
प्रभाग 18 : 12,475 मतदार























