लोकांचा उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू; नाणार रिफायनरी प्रश्नी आता विरोधकांची आक्रमक भूमिका
Nanar refinery project : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरुन दोन गट पडले आहेत. यापूर्वीच शिवसेनेने आम्ही स्थानिकांसोबत असल्याची भूमिका घेतली आहे. तर लोकांचा उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू, असा इशारा नाणार रिफायनरी विरोधकांनी दिलाय.
रत्नागिरी : नाणार तेल शुद्धीकरण कारखाना हा कोकणातील कायम चर्चेत राहिलेला प्रकल्प आहे. शिवसेनेनं या प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांच्या बाजूनं असून हा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा केली. पण, त्यानंतर देखील समर्थक प्रकल्पासाठी आशावादी असून विविध स्तरावर, विविध संघटनांकडून सध्या प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, या प्रश्नी समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत 8500 हजार एकर जमिनीधारकांची प्रकल्पाला संमती असल्याचा दावा केला. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.
या साऱ्याबाबत रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम यांना विचारले असता त्यांनी, 'हा प्रकल्प रद्द झाला आहे. आम्ही सध्या स्थानिकांच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करत आहोत. त्यामुळे समर्थक प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. पण, यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू असं अशोक वालम यांनी स्पष्ट केलं आहे. परिणामी, विरोधक देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे हा प्रकल्प होणार असून आसपासच्या गावांची जवळपास बारा ते साडेबारा हजार एकर जमिन जाणार आहे. याप्रकल्पामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असून जवळपास लाखभर स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी काय म्हणाले वालम? भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि नाणारचा प्रश्न मार्गी लागेल असं विधान रविवारी केलं होतं. त्यावर देखील वालम यांनी टीका केली आहे. त्यांना सध्या काहीच काम नाहीय त्यामुळे जठार अशी विधानं करत आहेत. नाणार विरोधकांमुळे काय होऊ शकतं हे जठारांनी देवगड येथे अनुभवलं आहे, असं देखील वालम यावेळी म्हणाले. शिवाय आम्हाला तेल शद्धीकरण कारखाना नव्हे तर प्रदुषणकारी कोणताही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. काजू, आंबा, करवंद, जांभूळ यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आल्यास त्याचं स्वागत करू. प्रकल्प यावेत पण ते पर्यावरणपुरक असावेत असं वालम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी समर्थक आग्रही होत असताना विरोधक देखील आता आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेची नेमकी भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांना समर्थक भेटल्यानंतर एबीपी माझानं शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यावर बोलताना हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे. काहीही झालं तरी नाणार प्रकल्प होणार नाही असं स्पष्ट केलं. शिवाय, शिवसेना प्रवक्ते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील नाणारबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं म्हटलं होतं.
नाणारचा मुद्दा का आला पुन्हा चर्चेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत स्थानिकांना प्रकल्प नको. त्यामुळे तो रद्द करण्याचा निर्णय झाला. स्थानिकांना हवा असल्यास प्रकल्प करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नाणार रिफायनरी समर्थक सध्या प्रकल्प व्हावा. प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा वाढत असून आमच्याकडे 8500 हजार एकर जमिनिची संमतीपत्र असल्याचा दावा केला जात आहे.