Nana Patole: संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये, नाना पटोलेंचा घणाघात
Nana Patole On Sanjay Raut: महाविकास आघाडी स्थापन करताना पवार सोनिया गांधींकडे गेले होते सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या, असे नाना पटोले म्हणाले.
नागपूर : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर (Sharad Pawar Resignation) राज्यात खळबळ मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात असं वक्तव्य केलं दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर आज पटोलेंनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर (Nana Patole Slams Sanjay Raut) केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करेल असे वाटत नाही. शरद पवार शाहू फुले आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाही असे आमचा विश्वास आहे अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जाऊ शकतात. संजय राऊत यांनी चोंबडेगिरी थांबवावी. ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या तिथे प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये, असे नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर आम्ही भाजपविरोधात लढू : नाना पटोले
नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करणार नाही. जर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली तर आम्ही भाजपविरोधात लढू. भाजप विरोधात लढण्यासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या.
मविआ स्थापन करताना पवार सोनिया गांधींकडे गेले होते : नाना पटोले
शरद पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जे आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असे नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे आल्या नव्हत्या. शरद पवार सोनिया गांधींकडे गेले होते. आज त्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ते मोठे नेते आहे ते काहीही बोलू शकतात लिहू शकतात योग्यवेळी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ, असे नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न
नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला अध्यक्ष करावा हा त्यांचा अधिकार आहे त्यामध्ये आम्ही फारसा हस्तक्षेप करणार नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही झालं ते आम्हाला फारसं माहित नाही. आम्ही प्रकाशन सोहळ्याच कार्यक्रम पाहिलाच नाही. त्यामुळे निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय बोलत होते हे आम्ही फारसं पाहिलं नाही.