मोठी बातमी! ऑडी हिट अँड रन प्रकरणाला नवं वळण, अपघातावेळी गाडी चालवणाऱ्याचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं समोर
Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
Nagpur Accident नागपूर: नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन (Nagpur Audi Car Accident) अपघातात मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरच्या रामदासपेठेतील अपघातात ज्या ऑडी कारचा अपघात होऊन दोन इतर कार आणि दुचाकीला धडक बसली, त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी एकदा महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. अशी माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागली आहे. मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी असलेले जितेंद्र हावरे हे गेले काही वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघातात आता काँग्रेस कनेक्शन उघड झाले असून या अपघातातील सर्वपक्षीय मैत्री असल्याचेही पुढे आले आहे.
सुषमा अंधारे यांच्या आरोपामागील सत्यं पुढे?
दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणात (Nagpur Audi Car Accident) विकास ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात देवाणघेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे की जे संकेत बावनकुळे यांना वाचवत आहे? विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले? यात विकास ठाकरे यांचे काही स्थानिक राजकारण असू शकते, अशी शक्यता व्यक्त करत सुषमा अंधारे यांनी विकास ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, त्यांच्या या आरोपानंतर ही नवी माहिती पुढे आल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
पोलिस या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज देणार नसल्याची माहिती
त्याचबरोबर पोलिस या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या अवघ्या काही मिनिटापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. त्यामध्ये अर्जुन हावरे गाडी चालवत असून शेजारी संकेत बावनकुळे आणि पाठीमागे रोनित चींतमवार बसलेला आहे. हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सुषमा अंधारेंनी अपघात घडवणाऱ्या ऑडीची पाहणी केली. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात अपघात घडवणारी ऑडी दोन दिवसापासून उभी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा