Nagpur Lok Sabha : मतदार याद्यांमधील गोंधळामागे मविआच्या नेत्यांचाच हात; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले...
Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नागपुरातून मंत्री असलेल्या नेत्यांनीच नागपुरातील मतदार याद्यांमध्ये घोळ घातला, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
Nagpur Lok Sabha Election 2024: नागपुरात (Nagpur) मतदानाची घटलेली टक्केवारी आणि त्यासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याच्या मुद्द्यावरून नागपुरात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदार याद्यांमधील चुकांचा हाच मुद्दा आता न्यायालयाच्या दारी देखील पोहोचला आहे. अशातच राज्यात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार असताना नागपुरातून मंत्री असलेल्या नेत्यांनीच नागपुरातील मतदार याद्यांमध्ये घोळ घातला, असा गंभीर आरोप भाजपने (BJP) केला आहे. निवडणूक आयोगाने नागपुरातील मतदार याद्यांची सखोल चौकशी करावी, तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
नागपुरातील मतदार याद्यांमधील गोंधळा संदर्भात भाजपने आधीच न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासाठी भाजपने तयारीही सुरू केली आहे. मात्र, भाजप नेते कृष्णा खोपडे यांनी नागपुरातील मतदार याद्यांमधील घोळ बद्दल महाविकास आघाडीला जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना नागपुरातील अनेक नेते मंत्रीपदावर होते आणि त्यापैकीच कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासनानं मतदार याद्यांमध्ये जाणून बुजून चुका केल्या, भाजपच्या मतदारांची नावं डिलीट केली. असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करून दोषी प्रशासनिक अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही कृष्णा खोपडे यांनी केली आहे. त्यामुळे आता नागपुरातील मतदार याद्यांमधील गोंधळावरुन निकालापूर्वीच राजकारण आणखी तापताना दिसत आहे.
मतदार याद्यांमधील गोंधळ न्यायालयाच्या दारी
नागपूर प्रशासनाने यंदा 75 टक्क्यांपर्यंत मतदान वाढवू, असा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले. त्यानंतर भाजपसह अनेक पक्षानी कमी मतदानासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तर प्रशासनानं बचावात्मक पवित्रा घेत मतदार यादीत वारंवार होणाऱ्या दुरुस्त्यासंदर्भात नागरिकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा मुद्दा पुढे केला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं मतदार याद्यांचा घोळ न्यायालयाच्या दारात नेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी भाजपने 19 एप्रिल रोजी ज्या ज्या मतदारांना मतदान करता आलेलं नाही, किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं, अशा लोकांकडून माहिती गोळा करणे सुरू केले आहे. नागरिकांकडून सर्व माहिती गोळा केल्यानंतर त्याचा समावेश भाजपकडून केल्या जाणाऱ्या याचिकेत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नागपुरात नियोजनबद्ध पद्धतीने षड्यंत्र करून हजारो सामान्य मतदारांची नाव मतदार यादी मधून डिलीट करण्यात आल्याचा आरोप ही भाजपने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या