मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची पोच पावती जनतेकडून मिळेल : उदयनराजे
मराठा आरक्षणासंदर्भात याआधी अनेक घोषणा झाल्या. मराठा आरक्षणाचा निर्णय आधीच मार्गी लागणे अपेक्षित होतं, मात्र का लागला नाही याची मला माहिती नाही, असा टोलाही उदयनराजेंनी आघाडी सरकारला लगावला.
सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासकामाची पोच पावती जनता त्यांना नक्की देईल, असं उदयनराजे म्हणाले. इतकंच नाही तर आघाडी सरकारनं रखडवलेल्या प्रश्नांवर उदयनराजेंनी टोलाही लगावला. साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते.
विशेषत: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजेंनी फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात याआधी अनेक घोषणा झाल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच मार्गी लागणे अपेक्षित होतं, मात्र ते का शक्य झालं नाही याची मला माहिती नाही, असा टोलाही उदयनराजेंनी आघाडी सरकारला लगावला.
सध्याच्या सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना नक्की मिळेल अशी मला खात्री आहे, असं उदयनराजे म्हणाले.
ज्यांनी कामं केली त्यांची स्तुती केली पाहिजे
भाषणानंतर एबीपी माझाशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, ज्यांनी कामं केली त्यांची मी स्तुती केली. जे काम करतात त्यांची स्तुती केलीच पाहिजे आणि का करु नये. मागच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प रखडले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महात्या करावी लागली. अनेकांनी हालाकीचे दिवस काढले, अशी टीका उदयनराजेंनी आघाडी सरकारवर केली.
मला फरक पडत नाही
"माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे मला त्रास होईल की नाही, याची मला भीती वाटत नाही आणि त्याचा मला फरकही पडत नाही. अनेकजण याला घरचा आहेर म्हणत असतील तरी मला फरक पडत नाही. माझ्या या बोलण्याचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही", हे देखील उदयनराजेंनी स्पष्ट केल.
गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर आणि श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत भाजपशी जवळीक साध्यण्याचा प्रयत्न केला का? आणि उदयनराजे भाजपच्या वाटेवर आहेत का? या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.