फडणवीस-ठाकरे भेट! येणाऱ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा? मनसेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंचा स्वभाव पाहता त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी गप्पा मारावे असे अनेकांना वाटतं, त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली.
Prakash Mahajan : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा स्वभाव पाहता त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी गप्पा मारावे असे अनेकांना वाटतं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले असतील अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी दिली. दोन राजकीय नेते भेटल्यावर सहाजिक राजकीय गोष्टींवर चर्चा होणार. राज ठाकरेंना आगामी निवडणुकीसाठी सोबत घेण्याबाबत देखील ही भेट असू शकते, असे मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.
सहज दोन राजकीय नेत्यांची भेट या दृष्टीने या भेटीकडे पाहिले पाहिजे असे प्रकाश महाजन म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी फडणवीस आले होते. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी गप्पा मारावे असे अनेकांना वाटतं, त्यामुळे फडणवीस आले असतील असे महाजन म्हणाले. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याबाबत अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा असल्याची बातमी सुरु आहे, पण असा काही निर्णय असल्यास तो राज ठाकरे घेतील असंही प्रकाश महाजन म्हणाले.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटण्यासाठी गेल्यावर संजय राऊतांच्या पोटात दुखू लागलं
राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्यावर संजय राऊत गप्प कसे राहतील. दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणारा अग्रलेख लिहिला होता, पण देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांच्या पोटात दुखू लागल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. संजय राऊत कुणाच्या खुर्च्या उचलतात, कोणाच्या फरशा पुसतात आणि कुणाचे जोडे उचलतात हे सर्वांना माहीत आहे असंही महाजन म्हणाले. संजय राऊत केजरीवाल यांना सल्ला देतात, राहुल गांधी यांना सल्ला देतात, त्यांच्याकडे फक्त तेवढेच काम राहिला आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून जगातील सर्वांना संजय राऊत सल्ला देतात, पण उद्धव ठाकरे यांना माहित आहे राऊत यांच्या सल्ल्यात काही अर्थ नाही असा टोला देखील महाजन यांनी लगावला.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काय घडलं?
आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मी घरी येईल. त्यानुसार आज मी त्यांच्या घरी गेलो होतो असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या घरी ब्रेकफास्ट केला, त्यांच्याशी गप्पा मारल्याचे फडणवीस म्हणाले. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो असेही फडणवीस म्हणाले. युतीसंदर्भात कोणतीही चर्चा यावेळी झाली नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळ्यात आल्याच्या चर्चा आहेत, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारले असता, ते म्हणाले की, असं कसं होणार आहे? काहाही नवीन चर्चा होते? अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

























