झाडाच्या कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, दोघांना अटक
शेतमालक आणि सालदार या दोघांविरोधात ॲट्रोसिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव : झाडावरच्या कैऱ्या तोडल्या म्हणून शेतमालकासह सालदाराने एका अल्पवयीन मुलाला 2 तास झाडाला बांधून ठेवले. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यतील अंजन विहिरे गावात घडली. धक्कादायक म्हणजे, शेतमालकाने त्या मुलाच्या अंगावर लघवी देखील केली असल्याचे पीडित मुलाने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील आणि प्रवीण पावऱ्या अशी या घटनेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दोघे अंजनविहिरे येथील रहिवासी आहेत. गोपी हा शेतमालक आहे तर प्रवीण हा त्याच्याकडे सालदारकी करतो.
या घटनेसंदर्भात पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा यावर्षी 12 वीच्या शिक्षणासाठी मामाकडे अंजनविहिरे येथे आला होता. 5 जून रोजी तो त्याच्या आजीची औषधी घेऊन गिरड गावातून घरी परत जात होता. रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीणने त्याला जाब विचारला. गोपीला त्याने फोन करून शेतात बोलावून घेतले. नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोरच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी गोपीने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. तसेच त्याच्या अंगावर लघवी केली असल्याची तक्रार पीडित मुलाने पोलिसांच्या कडे केली आहे. या घटनेचा व्हिडीओ शेतमालकाच्या मुलाने च व्हॉट्सअपवर व्हायरल केला आणि पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार मामा व आजीला सांगितला. नंतर दुसऱ्या दिवशी 6 जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपींविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेच्या संदर्भांत पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी सह अन्य कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र मारहाण करताना या मुलांच्या अंगावर लघवी केल्याचा प्रकार अद्यापर्यंत पोलीस तपासात समोर आलेला नाही. ही घटना केवळ आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्या या कारणावरून झाली आहे. यामध्ये कोणताही जातीयतेचा विषय अद्याप समोर आला नसल्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
