शेतकऱ्यांनो सोयाबीन जपा! छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांचा कडकडाट, उर्वरित मराठवाड्यात कसा राहणार पाऊस?
मराठवाड्यात आता खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीनवर पिवळा मोझॅक दिसत असून शेतकऱ्यांनी कसे करावे पिकांचे व्यवस्थापन?
Marathwada Rain: राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून पुणे,मुंबईसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मराठवाड्यात येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान, मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी कसा आहे पावसाचा अंदाज?
मराठवाड्याचा पावसाचा अंदाज
मराठवाड्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला असून त्यानंतर हलक्या व मध्यम सरींचा पाऊस राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणीही पाऊस असेल पण तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार शनिवारी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर धाराशिव, लातूर, परभणी, बीड हिंगोलीत हलक्या सरींचाच पाऊस राहील. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
मराठवाड्यात आता खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाच्या खंडामुळे तसेच त्यानंतर विस्कळीत स्वरुपाच्या हवामान बदलामुळे मराठवाडयातील सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाने दिलेल्या कृष हवामान सल्ल्यानुसार,
- सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- तसेच सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासही सांगण्यात आले आहे.
- सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची कोणत्याही प्रकारचे तणनाशक न मिसळता पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी.
- सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी
हेही वाचा: