जालन्यातील साष्टपिंपळगाव येथे आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना अटक, मराठा नेत्यांकडून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध
20 फेब्रुवारी 2021 पासून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असा पवित्रा घेऊन साष्टपिंपळगाव गावातील ग्रामस्थ आंदोलनासाठी बसले होते.
मुंबई : मागील 55 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या साष्टपिंपळ गावातील आंदोलकांना आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यभरातील मराठा नेत्यांनी सरकारच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. 20 फेब्रुवारी 2021 पासून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असा पवित्रा घेऊन साष्टपिंपळगाव गावातील ग्रामस्थ आंदोलनासाठी बसले होते. याला राज्यभरातील अनेक मराठा संघटनांनी पाठींबा देखील दिला होता. या आंदोलन स्थळी अनेक मंत्री देखील येऊन गेले होते
. या आंदोलनाबाबत बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, मागील 55 दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे ग्रामस्थ मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असा पवित्रा घेऊन आंदोलन करत होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे आंदोलन अतिशय शांततेत सुरू होतं. तरीदेखील आज सरकाने हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस कारवाई घडवून आणली आहे. आज जवळपास 50 पेक्षा देखील जास्त आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व मराठा संघटना सरकारच्या उभा कृतीचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. मागील 55 दिवसांपासून आंदोलन करत असून देखील आजपर्यंत या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी साष्टपिंपळगाव ते बारामती बाईक रॅली काढण्याचा इशारा दिला होता. हे कारण पुढे करून आज मराठा समाजातील आमच्या बांधवांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मनोज जरांगे पाटील, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनील औटे, सतीश बोचरे यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण येऊन गेले होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं की, आरक्षण प्रश्नी आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू. परंतु तोडगा काढणं बाजूला राहिलं. यांनी आज बळाचा वापर करून आंदोलकांनाच अटक केली आहे.
साष्टपिंपळगाव येथे अटक झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील म्हणाले की, जालना साष्टेपिंपळगाव येथे मराठा आंदोलकांना अटक करण्यात आली. गेल्या 55 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. मराठा कार्यकर्ता तसेच महिलांचा मोठा सहभाग या आंदोलनात होता. या आंदोलनस्थळी राजेश टोपे आणि अशोक चव्हाण यांनी स्वतः भेट दिली होती तसेच यातून मार्ग काढू असं आश्वासन देण्यात आले होते. मात्र तसे काही न करता आज या आंदोलन ठिकाणी पोलीस पाठवून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. शांततेने चाललेले हे आंदोलन जाणीवपूर्वक चिरडण्यात आले असल्याचा आरोप मराठा समनव्यक करत आहेत.
आंदोलनाबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समनव्यक वीरेंद्र पवार म्हणाले की, सरकारने आज हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत.