'मराठा आरक्षणाच्या लढाईचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं', 'या' नेत्याची मागणी
मराठा आरक्षण पूर्ववत द्यावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती हा लढा देत आहेत. मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी केली जात आहे.
बीड : मराठा आरक्षण पूर्ववत द्यावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती हा लढा देत आहेत. मात्र या मागणीमध्ये एकवाक्यता बघायला मिळत नाही. म्हणून मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावं असं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे या संदर्भामध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे उदयनराजे भोसले यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणार आहेत. लवकरच या संदर्भात मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घ्यावी आणि त्याचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी आता विनायक मेटे यांनी केली आहे.
मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार गेल्या 5-6 दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व पक्ष नेत्यांना सोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांकडून फक्त पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवारदेखील कधीही मराठा आरक्षणावर बोलत नाहीत. , समाज त्यांना मानतो, मात्र समाजासाठी ते बोलायला तयार नाहीत असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहेत. यात अनेक संघटना राजकीय पक्ष आणि नेते वेगवेगळ्या आंदोलनाची हाक देत आहेत मात्र मराठा आरक्षण पुरवत मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आंदोलनाची गरज असून यासाठी सगळे मराठा समाजातील नेते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडावे असे आवाहन विनायक मेटे यांनी केले आहे.
'मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबतच, आंदोलनं करु नका', मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलनं पुकारली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले होते की, मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार - अशोक चव्हाण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली होती. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र काम करत आहेत. 15 तारखेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांच्यासोबत ही मराठा आरक्षण संदर्भात बैठक होणार आहे. आम्हाला कोणताही राजकीय वाद करायचा नाही, सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. मराठा समाजासोबत संपूर्ण राज्य सरकार आहे. त्यामुळे वादाचा कोणताही मुद्दा नाही. पुन्हा सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे सल्ला घेण्यात येत आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती.
संबंधित बातम्या
पवार 50 वर्ष राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, अध्यादेशाच्या पर्यायावर चंद्रकांत पाटील
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार : अशोक चव्हाण
'मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबतच, आंदोलनं करु नका', मुख्यमंत्र्यांचं आवाहन