(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जरांगेंच्या रॅलीला होकार पण सभेला मात्र बीड पोलिसांची परवानगी नाही; नेमकं कारण काय?
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जरांगे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभेला बीड पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी (Beed Police) परवानगी दिलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे. समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.
आठ तारखेलाच शांतता रॅलीला परवानगी दिली- धनंजय मुंडे
जरांगे यांच्या बीडमधील रॅलीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात अधिक माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाने शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. पण प्रशासनाने या रॅलीला परवानगी नाकारली अशी अफवा पसरवण्यात आली आहे. पण सत्यस्थिती अशी आहे की 8 तारखेला या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. मी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. म सुद्धा त्यांच्या लढ्यात सामील झालो होतो, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच शांतता बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
मनोज जरांगे यांची छगन भुजबळ यांच्यावर टीका
दरम्यान, मनोज जरांगे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रॅली, सभा करत आहेत. त्यांच्या या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते आपल्या भाषणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला करत आहेत. राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारनं बळ दिलं आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रिपद दिलं आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.
हेही वाचा :
भूकंप आणि पावसाचे नाते काय? पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!