Sadhu Vaswani Center : गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच खरे चमत्कार ; कृष्णा कुमारी यांचे प्रतिपादन
Nagpur : चांगल्या कर्मातून जीवन बदलू शकते, ज्याप्रकारे दिव्यशक्तीचे अस्तित्व आहे, तसेच आत्मा-भूतही आहे. एखाद्याची इच्छा गरज पूर्ण झाली नसल्यास हा प्रकार घडत असल्याचे दीदी कृष्णा कुमारी यांनी सांगितले.
Sadhu Vaswani Mission Nagpur News : आपली उर्जा सेवा कार्यात लावणे, गरीब गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच खरे चमत्कार आहे. एखाद्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हेच खरेच चमत्कार असल्याचे प्रतिपादन साधु वासवानी मिशन कार्यकारी अध्यक्षा दीदी कृष्णा कुमारी यांनी केले.
प्रेस क्लबमध्ये शनिवारी साधु वासवानी सत्संग सेंटर, नागपूरच्या वतीने उद्या, 29 जानेवारीला सायंकाळी 6.15 वाजता आयोजित सत्संग कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. धिरेंद्र कृष्ण महाराजांबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीदी कृष्णा कुमारी म्हणाल्या,धीरेंद्रकृष्ण महाराजांबाबत मी एकले वा वाचले नाही. त्यामुळे त्यांच्या दाव्याबाबत माहिती नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे चमत्कार होऊ शकतात. चांगल्या कर्मातून जीवनही बदलू शकते. जगात दिव्यशक्ती, आत्मा व भूतही असतात. एखाद्याची इच्छा गरज पूर्ण झाली नसल्यास हा प्रकार घडत असल्याचेही त्या म्हणाल्या.
साधु वासवानी सत्संग सेंटर, नागपूरचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, सिंधी भाषेत उद्या, रविवारी (29 जानेवारी) महत्मा गांधी स्कूल, जरिपटका येथील मैदानात सत्संग होणार आहे. यावेळी निरोगी व सुदृढ जगण्याबाबतचे मार्गदर्शन दीदीद्वारे केले जाईल. पत्रकार परिषदेला घनश्याम कुकरेजा, तिरथ चैधरी, मंजू रीजानी, दौलत कुंभानी उपस्थित होते.
मुलांमध्ये मानसिक आजार वाढले
मुलांमध्ये मानसिक आजार वाढतांना दिसत आहे. वाढत्या आत्महत्याही त्यामागचे एक कारण आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचेही दीदी कृष्णा कुमारी यांनी सांगितले. परमेश्वर मंदिरातच नव्हे तर गरीबांच्या झोपडीतही आहे. त्यामुळे चांगले सेवक बसण्याची गरज असल्याची साधु वासवानी यांचे मत असून त्यादृष्टीने काम करण्याची गरजही दीदी कृष्णा कुमारी यांनी वर्तवली.ज्यांना सेवा करायची आहे. ज्यांना परमेश्वरावर विश्वास आहे. अशांनी परमेश्वराची सेवा म्हणून गरजूंची मदत करावी. आपली शक्ती, श्रद्धा, उर्जा चिमुकल्यांच्या शिक्षणात लावावी. एक चारित्र्यवान नागरिक एक सशक्त देश घडवू शकतो. देशाच्या प्रगतीसाठी चारित्र्यवान नागरिक महत्त्वाचे आहेत असेही त्या म्हणाल्या.
स्वार्थ हेच हिंसेचे कारण...
आजच्या युगात प्रत्येकव्यक्ती स्वार्थी झाला आहे. स्वार्थाशिवाय कुठलेही कार्य तो करत नाही. आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यासाठी मनुष्य तयार आहे. त्यामुळे जगभरात हिंसा होत आहे. यावर नियंत्रण हवे असल्यास प्रत्येकाने आपलं कर्म करावं. एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना निर्माण झाल्यास हिंसा नष्ट होईल, असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी देखील वाचा...