येत्या 24 तासात पोलीस विभागात मोठे फेरबदल, बड्या आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतआहे. त्याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतही मुख्यमंत्री यांची चर्चा झाल्याचं कळतंय.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्याच्या पोलिस विभागात मोठे बदल करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार किंवा गुरुवारपर्यंत राज्यात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ठाणे, पुणे, नागपूर, मीरा भाईंदर आयुक्तांसह मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसेच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत. यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश देतील असं कळतय. गेल्या वेळी मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा अंतिम झाली. त्याअधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतही मुख्यमंत्री यांची चर्चा झाल्याचं कळतंय. नव्या नियुक्त्यांची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी बिपीन कुमार सिंह यांच नाव निश्चित झाल्याच कळतंय.
तर मीरा भाईंदर पोलिस आयुक्तपदी सदानंद दाते यांच नाव निश्चित केलं गेलं आहे, अशी माहिती आहे. पुणे पोलिस आयुक्तपदी के. वेंकटेशम यांना काही महिन्यांसाठी एक्सटेंशन मिळणार असल्याच सांगितलं जात आहे. वेंकटेशम यांचं पुढच्या तीन महिन्यात प्रमोशन होणार त्यानंतर पुणे शहरासाठीच नवीन पोलिस आयुक्त मिळतील. पुणे आयुक्तपदाच्या शर्यतीत अतुलचंद्र कुलकर्णी, राजेंद्रसिंह, रितेश कुमार, संजय कुमार यांची नावं आघाडीवर आहेत.
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पण तरीही त्यांना या वर्षासाठी एक्सटेंशन दिली जाण्याची माहिती मिळत आहे. या पोस्टसाठी प्रशांत बोरुडे यांच्या नावाची चर्चा होती. सूत्रांवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोरुडे यांच्या नावाबद्दल मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर कृष्ण प्रकाश यांची नियुक्त होण्याची माहिती आहे. यासह नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार हेही बदलण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदासाठी मिलिंद भारंबे तर सहआयुक्त कायदा व सुव्यवस्थेसाठी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या जागेवर नाशिक पोलिस आयुक्त म्हणून कैसर खालीद आणि दिपक पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या सोबतच आयजी स्तरावर मोठे फेरबदल करण्यास तयार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने राज्यात पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या ही करण्यात येतील.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे 10 डीसीपींची बदली केल्याबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष झाला होता. असं म्हटलं जात होते की राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता डीसीपी बदल्यांची यादी जारी केली. ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्या बदल्या थांबवण्यात आल्या व 7 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नवीन यादी देण्यात आली. या वेळेस तसं काही होऊ नये म्हणून मुख्यमंत्री स्वत: या मोठ्या बदली यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.