Majha Maharashtra Majha Vision | कोरोना लस कधी येईल याची शाश्वती नाही, लस आली तरी गाफिल राहू नये : राजेश टोपे
#MajhaVision2020 : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोनाची लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही, असं आवाहन केलं.

Majha Maharashtra Majha Vision 2020 : "कोरोनाला पूर्ण हरवायचं आहे, हा आपला उद्देश आहे. कोरोनाची लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही," असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय 17 हजार रिक्त जागा भरणार आहोत, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
आरोग्य मंत्र्यांचं व्हिजन कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे दुय्यम नजरेने पाहिलं जायचं. परंतु कोरोनामुळे आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. एक टक्क्याच्या कमी या विभागावर खर्च करण्यात आला. यावरुन लोकांमध्ये रोष होता. त्यामुळे आरोग्यावरचा वाढवण्याचं सरकारने मान्य केलं आहे. कोरोनाला पूर्ण हरवायचं आहे. आपल्याकडे संख्या असली तरी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून धोरणं ठरवली. आता कोणत्याही परिस्थितीत कोविडसह नॉन कोविडकडे लक्ष द्यावं लागेल. फोर एम तत्त्वांनी काम करणार आहोत. पैशांची अडचण आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेत चार हजार चारशे कोटी रुपयांचा सॉफ्ट लोनचा प्रस्ताव दिला आहे. त्यामधून उपकरणांची, बांधकामांची कमतरता भरुन काढणार आहोत. पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप या पीपीपी मॉडेलवर भर देणार आहोत. आशा वर्कर्सचा पगारवाढ केला आहे. 17 हजार रिक्त जागा भरणार आहोत. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून नवी मंडळांची स्थापना करणार आहोत. माता-बालकांचा मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरी भागांमधील मानसिक आरोग्यावर लक्ष देणार आहोत.
तसंच अवयव दानासाठी आपल्या राज्याला प्रथम पारितोषिक मिळाल्याचं टोपे यांनी नमूद केलं. याशिवाय कुष्ठरोग आणि क्षयरोग्यांचा निदान होण्यासाठी महिनाभराचा कार्यक्रम राबवणार आहे, त्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी जनतेला केलं.
नवी मुंबईतील कोरोना सेंटरमध्ये सुरु असलेल्या घोटाळ्याचा एबीपी माझाने पर्दाफाश केला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील या कोविड सेंटरमध्ये चाचणी न केलेल्या, मृत व्यक्तींचेही बनावट अहवाल दिले जात असल्याचं समोर आलं. यासंदर्भात राजेश टोपे यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही सगळीकडे सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, "कोरोनाची लाट म्हणण्यापेक्षा कोरोनाचं पिक म्हणू याआहे. संपूर्ण गोष्टी केल्यामुळे कोरोनाचं दुसरं पिक येण्याची लाट शक्यता नाकारता येत आहे. कोरोनाची टेस्टिंग वाढवलं आहे. सध्या एक लाख टेस्टिंग सुरु आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात याला सामोरं जावं लागणार नाही."
लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही "लॉकडाऊनमुळे सामान्यांचं आर्थिक नुकसान होतं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय आहे. गरज असेल तेव्हा करावाच लागेल. युरोपातील काही देशात लॉकडाऊन पुन्हा लागलं आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पिक येईल त्यावेळी लॉकडाऊन करणं भाग आहे. पण आपल्याकडे लॉकडाऊनची वेळ येईल असं वाटत नाही. सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील. संख्या वाढली तर या गोष्टींवर निर्बंध आणणं गरजेचं आहे. सरकार काळजी घेत आहे. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही," असं राजेश टोपे म्हणाले.
लस कधी येईल याची शाश्वती नाही "कोरोनाची लस लवकर यावी अशी अपेक्षा आहे. लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण कोरोना लस वितरित करण्याची पूर्वतयारी सरकारकडून सुरु आहे. डेटा बनवण्याचं काम सुरु आहे. मात्र लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही," असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. "लसीकरणासाठी प्राधान्य हे फ्रण्ट लाईनवर असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांवरील लोकांना ही लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
दिवसभर दिग्गज नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन फक्त एबीपी माझावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घेण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
