एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा जिल्हा, माझा बाप्पा
मुंबई : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील गणपतींचं आज विसर्जन झालं. प्रत्येक जिल्ह्यांमधील पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनांनी गणपती विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली होती. पाहूया जिल्हानिहाय गणपती विसर्जनाची बित्तंबातमी :
मराठवाडा
हिंगोली : हिंगोलीत गणपती विसर्जनाआधी भाविकांची वेगळीच लगबग सुरु होती. हिंगोलीत छोट्याशा गल्लीत असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी रांगा लावल्या. विसर्जनाच्या दिवशी चिंतामणीला नवसाचा मोदक दिला जातो. भाविक त्याची वर्षभर पूजा करतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यावर दुसऱ्या वर्षी 1,008 मोदकांचा प्रसाद गणपतीला अर्पण करून आपला नवस फेडतात. बीड : बीडमध्येही मोठ्या भक्तीभावाने बाप्पाला निरोप दिला. मोठ्या आनंदात गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक पार पडली. शहरातील कांकालेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीत पालिकेने मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ठाण्यात बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले. जालना : जालना शहरात 11 दिवसांच्या घरगुती गणरायांना वाजतगाजत निरोप देण्यात आला. यंदा चांगला पाणीसाठा झाल्यानं मोती तलावात बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. लातूर : लातूरच्या 'आजोबा गणपती'नं निरोप घेतला आणि मगच राज्यभरातल्या शहरातल्या इतर बाप्पांनी आपापल्या मंडळांमध्ये प्रस्थान ठेवलं. लातूरच्या या आजोबा बाप्पासमोर लेझीम आणि ढोल पथकांच्या तालावर तरुणाई थिरकली. या मिरवणुकीत घोडे, उंटांचाही समावेश होता.उत्तर महाराष्ट्र
जळगाव : जळगावमधल्या मेहरुण तलावातलं प्रदूषण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाची सोय केली. दुसरीकडे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मात्र गणरायाची तलावातच विसर्जन करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे इकोफ्रेन्डली गणेश विसर्जनाला काहीसा संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार : नंदुरबारमध्ये सकाळी 8 वाजल्यापासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. डीजे आणि डॉल्बीला फाटा देत नंदुरबारकरांनी पारंपरिक वाद्यांसह बाप्पांना निरोप दिला. नंदुरबारच्या माळीवाड्याचा राजा हा यंदाही आकर्षणाचा केंद्रबिदू होता. अहमदनगर : अहमदनगरात ग्रामदैवत असलेल्या माळीवाड्यातल्या विशाल गणपतीची पूजा झाल्यानंतरच शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पाऊस असतानाही पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात अमहदनगरकरांनी बाप्पांना निरोप दिला. मनमाड : मनमाडचं अराध्य दैवत श्री नीलमणी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतरच गावातल्या इतर मिरवणुका सुरु झाल्या. बाप्पांची पालखी सुरु होताच दवंडी पिटण्यात आली आणि मग विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी बाप्पांच्या स्वागतासाठी रांगोळ्या सजल्या. तर साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी भक्तांची मने जिंकली. जळगाव : जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात तरुणांनी टाळ हाती घेऊन गणपतीची मिरवणूक काढली. गरताड या गावात ही अनोखी मिरवणूक काढली गेली. डॉल्बी, ढोल-ताशा यांचा वापर न करता साध्या पद्धतीने मिरवणूक काढली जावी, असं आवाहन गावातल्या ज्येष्ठ लोकांनी केलं होतं. त्यानुसार वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार या गावात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. धुळे : धुळ्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आज हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दिसलं. गेल्या 121 वर्षांची परंपरा असलेल्या धुळ्यातल्या खूनी गणेशावर आज धुळ्यातल्या मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. इतकंच नाही. तर मिरवणुकीचा मार्ग रांगोळ्यांनी सजला होता. गणरायाला भक्तांकडून नोटांचा हारही अर्पण करण्यात आले.विदर्भ
नागपूर : नागपूरमधील तुळशीबागेतून मानाचा नागपूरचा राजानं प्रस्थान ठेवलं आणि मग शहरातल्या इतर गणरायांची विसर्जन मिरवणूक सुरु झाली. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून या राजाने नागपूरकरांना दर्शन दिलं आणि 20 किलोमीटर दूर असलेल्या कोराडीच्या तलावाच्या दिशेने राजा रवाना झाला. अकोला : अकोला शहरात मानाच्या बाराभाई गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली. या मानाच्या गणपतीपाठोपाठ अनेक मंडळांच्या आणि घरगुती गणेशांचंही विसर्जन करण्यात आलं. मोरणा नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनानं नागरिकांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन केलं. गणेश घाटावर तब्बल सात कुंडांची निर्मिती केली ज्याला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला. वाशिम : महाराष्ट्रात सर्वाधिक वेळ चालणारी मिरवणूक अशी ओळख असलेल्या वाशिममध्येही दणक्यात मिरवणुका सुरु झाल्या. शहरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक झाल्यानंतर शिवशंकर गणेशोत्सव मंडळाचा गणपती मार्गस्थ झाला. खासदार भावना गवळी यांच्या हस्ते आरती झाली आणि त्यानंतर खासदारांनी ठेकाही धरला. वर्धा : वर्ध्यामध्ये आज प्रशासन आणि वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीनं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं. फक्त मंडळांचेच नाही, तर घरगुती बाप्पांचं सामूहिकरित्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं. शिवाय, पवनारमध्ये धाम नदीवरच्या नंदी आणि छत्री घाटावरही पोलीस मित्रांच्या सहाय्याने गणरायाला निरोप देण्यात आला. गोंदिया : राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुका मोठ्यामोठ्या गाड्यांमधून होत असल्या. तरी गोंदियात मात्र बाप्पांना बैलगाडीतून निरोप देण्यात आला. सोबत डीजेचा थाटही होता. एकीकडे डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. तर दुसरीकडे भजनामध्ये भक्त तल्लीनही झाले होते. चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये बाप्पांचं विसर्जन रामाळा तलावात होत असलं, तरी त्याआधी सारे बाप्पा चंद्रपुरातल्या रस्त्यांवर दर्शन देत मार्गस्थ झाले. कस्तुरबा मार्ग आणि गांधी मार्गावरून जाणारी गणपतीची ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो चंद्रपूरकरांनी गर्दी केली आणि त्यानंतरच साऱ्या बाप्पांना रामाळा तलावात निरोप देण्यात आला.पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या जंगी मिरवणुकांची सुरुवात झाली, ती तुकाराम माळी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने. पालखीतून निघालेल्या या मिरवणुकीत दिग्गज सहभागी झाले. शिवाय पंचगंगेच्या काठावर विविध मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन झालं. पण मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका आटोपण्यासाठी 24 तास उलटण्याची शक्यता आहे. सोलापूर : बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसानं सोलापूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला. शहरातल्या सिद्धेरामेश्वर तलावाकाठी गणेशभक्तांनी हजेरी लावली. भर पावसातही भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. सांगली : सांगलीच्या मिरजमध्येही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह होता. शहरात पहिल्यांदाच डॉल्बीमुक्त मिरवणुका पार पडल्या. बाप्पांच्या स्वागतासाठी शहरात रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. अखिल भारतीय मराठा महासंघाने उभारलेली हिंदकेसरी मारुती माने यांची कमान लक्षवेधी ठरली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
राजकारण
क्रीडा
Advertisement