लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांची महत्त्वाची भूमिका; राज्यातल्या लाखो माय-माऊलींची धडपड
लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांची महत्त्वाची भूमिका मोलाची भूमिका बाजवत आहेत. आपल्या संसाराचा गाडा हाकत राज्यातल्या लाखो माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत.
रत्नागिरी : कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. केवळ चार तासात चित्र बदलले. आरोग्याच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मास्क, सॅनिटायझरला बाजारात मागणी वाढली. काहींनी तर यामध्ये देखील संधी शोधत काळा बाजार करत, अव्वाच्या सव्वा भाव लावत आपली झोळी भरायला सुरूवात केली. सरकारनं छापेमारी करत या साऱ्या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर देखील मास्क पुरवायचे कसे? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत होता. अशा या कठीण काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ते राज्यातील बचत गट अर्थात स्वयंसहाय्यता समूह गट. आजघडीला राज्यात लाखो हात बचत गटाच्या माध्यमातून मास्क तयार करत कोरोनाच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आजघडीली किमान राज्याचा विचार करता लाखो मास्कची निर्मिती ही बचत गटांच्या माध्यमातून केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत राज्यातल्या लाखो माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना बचत गटांच्या माध्यमातून करोडो रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये आणि उलाढालींमध्ये रत्नागिरी जिल्हा अव्वल आहे. आज रत्नागिरीला जिल्ह्यात तब्बल 14 हजार बचत गट हे नोंदणीकृत आहेत. शेती, शेतीपुरक व्यवसायामध्ये हे गट सध्या काम करत आहेत. या 14 हजार गटांपैकी 100 गटांच्या 900 ते 1000 महिला या मास्क तयार करण्याचं काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर मास्कची कमतरता भासू लागली. पण, या कठीण आणि कसोटीच्या काळात देखील रत्नागिरीतील बचत गटांनी तब्बल 1 लाख 17 हजार 458 मास्क तयार केले आहेत. शिवाय, अजून देखील लाखो मास्कची गरज असून ते देखील आगामी काळात पुरवले जाणार आहेत. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 22 ते 25 लाखांची उलाढाल झाली आहे. तसेच हा आकडा आगामी काळात वाढणार आहे ही बाब देखील तितकीच लक्षणीय आहे.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
कसा होतो मास्कचा पुरवठा मास्क तयार करताना सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच मास्क तयार केले जात आहेत. राज्य आणि केंद्र शासनाच्या उमेद अभिनातंर्गत बचत गटांच्या माध्यमातून सध्या मास्क तयार केले. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल लाखाच्या पुढे मास्क तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील गटांच्या माध्यमातून 76 हजार 401 मास्क तयार करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बचत गट हे राज्यात अव्वल आहेत. शिवाय हा आकडा वाढणार आहे. ही बाब समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया प्रकल्प संचालक नितीन माने यांनी एबीपी माझाकडे बोलताना दिली आहे. तर, मास्कला कोणत्या भागात किती मागणी आहे. बचत गटांच्या माध्यमातून ते किती प्रमाणात पुरवले जातील. याचा सारा आढावा घेतला जातो. त्यानंतर बचत गटांकडे त्याबाबतची जबाबदारी दिली जाते. मास्कचा पुरवठा होत असताना त्या-त्या भागातील बचत गटांना सोयीस्कर व्हावं याचा देखील विचार केला जातो. त्यानंतर हे मास्क सरकारी कार्यालये, मेडिकल्स आणि ग्रामपंचायतींकडे देखील मागणीनुसार पुरवले जात असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अर्चना भंडारी यांनी एबीपी माझाकडे दिली.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
ही आमची सामाजिक जबाबदारी मास्क तयार केल्याने आम्हाला आर्थिक फायदा तर नक्की होत आहे. पण, ही गोष्ट आम्ही सामाजिक जबाबदारी म्हणून पाहतो. यातून आमच्या गटाने आतापर्यंत 1 लाख 30 हजाराची उलाढाल केली आहे. त्यातून प्रत्येक महिलेला पैसे देखील चांगले मिळाले आहेत. अद्याप देखील आमच्याकडे जवळपास 5 हजार मास्क तयार करून मागण्यात आले आहेत. कोरोना असताना सोशल डिस्टिन्सिंग पाळत, योग्य ती खबरदारी घेत प्रत्येक महिला तिच्या घरी मास्क तयार करते अशी प्रतिक्रिया सखी महिला उत्पादक समूहाच्या अध्यक्षा विधा कदम यांनी दिली आहे.
सकारात्मक बाब कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सर्वत्र नैराश्य दिसून येत आहे. पण, या कठिण काळात देखील बचत गटांचे हे कार्य महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय असेच आहे. यामुळे कोरोनारूपी राक्षसाशी दोन हात करण्यात माता-भगिनी महत्त्वाची भूमिका तर जबावत आहेत. शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळत आहे.
Special Report | लॉकडाऊनच्या काळात शेती आणि मत्स्य व्यवसायाला परवानगी, सरकारच्या निर्णयाने शेतकरी, मच्छिमारांना दिलासा