जागावाटपात ठाकरे गटाची आक्रमक भूमिका, पटोले-थोरात डिफेन्सिव्ह; काँग्रेसचे आमदार नाराज
Maharashtra Seat Sharing News : नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपाच्या चर्चेत नरमाईची भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी केल्याची माहिती आहे.
![जागावाटपात ठाकरे गटाची आक्रमक भूमिका, पटोले-थोरात डिफेन्सिव्ह; काँग्रेसचे आमदार नाराज mahavikas aghadi congress mla upset over seat sharing formula maharashtra politics marathi news जागावाटपात ठाकरे गटाची आक्रमक भूमिका, पटोले-थोरात डिफेन्सिव्ह; काँग्रेसचे आमदार नाराज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/349fe67d40072eed0aef92a06d3d80741710250590921584_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मविआच्या जागावाटपाच्या चर्चेवरुन (Maha Vikas Aghadi Seat Sharing) काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची माहिती आहे. लोकसभेसाठी काँग्रेसला फक्त 16 जागा मिळणार असल्याची चर्चा असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. तसेच शिवसेना जर आपल्या जागांवर दावा करत असेल तर आम्ही काय करायचं असा सवालही त्यांनी विचारला.
राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झाला नाही. मात्र त्यावरून आता महाविकास आघाडीतील मतभेद समोर येत असल्याचं दिसतंय. आधी वंचितच्या प्रस्तावावरून बऱ्याच घडामोडी घडल्या असताना आता काँग्रेसचे आमदारही आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.
काँग्रेसच्या आमदारांची गेल्या दोन दिवसापासून बैठक सुरू आहे. काँग्रेसला फक्त 16 जागा मिळणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसतोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या दाव्यावरून नाराजी
महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शिवसेना आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या अनेक जागांवर दावा केल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. शिवसेनेने आपल्या जागांवर दावा केल्यानंतर आम्ही काय करायचं असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच कमी जागा मिळणार असतील तर काँग्रेसने काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केलीय. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे आक्रमक भूमिका घेत नाहीत, त्यामुळे शिवसेना आपल्या जागांवर दावा करत असल्याची तक्रार आमदारांनी केलीय. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार आता पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सांगलीच्या जागेवरून काँग्रेस- शिवसेनेत वाद?
काही जागांवरून असलेला वाद आणि वंचितला किती जागा द्यायच्या हे अद्याप निश्चित झालं नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. अशात सांगलीच्या जागेवरून आता काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने येतात की काय असं चित्र निर्माण झालं आहे.
कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला देण्यात येणार असून त्याबदल्यात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळालीच पाहिजे, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असं विश्वजित कदम यांनी जाहीर केलंय.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)