Maharashtra : स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्सच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याच्या प्रवीण कांबळेंनी मिळवले पहिले स्थान
Maharashtra : स्थावर संपदा क्षेत्र एजंट्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात 7,624 पैकी 6,755 उमेदवार यशस्वी झाले आहेत. पुण्याच्या प्रवीण कांबळे यांनी 98% गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे.

Maharashtra : स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्सच्या नुकत्याच झालेल्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत 7,624 पैकी 6,755 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या सहाव्या परीक्षेचा निकाल 89% लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल 96% आणि दुसर्या परीक्षेच्या निकाल 93% ,तिसऱ्या परीक्षेचा निकाल 89% आणि चौथ्या परीक्षेचा निकाल 86%, पाचव्या परीक्षेचा निकाल 87% लागला होता.
पुण्यातील प्रवीण कांबळे पहिल्या क्रमांकावर
सहाव्या परीक्षेला 7,624 उमेदवार बसले होते आणि यातील 6,755 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात 5,637 पुरूष आणि 1,118 महिलांचा समावेश आहे. यापैकी 264 उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून यात 13 महिलांचा समावेश आहे. या परीक्षेत पुण्याच्या श्री. प्रवीण कांबळे यांनी 98% गुण मिळवून गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. यात मुंबईतील 84 वर्षीय श्री. दौलतसिंह गढवी हेही यशस्वी झालेले आहेत.
सहा परीक्षांमधून 20,125 उमेदवार पात्र
आतापर्यंत झालेल्या सहाही परीक्षांमधून 20,125 उमेदवार एजंटससाठी पात्र ठरले आहेत. यात आताच्या परीक्षेत 6 हजार 755, पहिल्या परीक्षेत 405, दुसऱ्या परीक्षेत 2 हजार 812, तिसऱ्या परीक्षेत 4 हजार 461, चौथ्या परीक्षेत 1 हजार 527, पाचव्या परीक्षेत 4 हजार 165, असे एकूण 20 हजार 125 उमेदवार पात्र ठरले आहेत.
महारेराने 10 जानेवारी 2023च्या आदेशान्वये एजंट्सच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं बंधनकारक केलेलं आहे.
स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंट्सच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंट्सचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंट्सना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार(Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र (Allotment letter), चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेलं आहे.
हेही वाचा:
Pune Accident: भोर-महाड मार्गावर वरंध घाटात भीषण अपघात; कार 100 फूट खोल दरीत कोसळली अन्...






















