(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Update : पावसाचं धूमशान... राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती, पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरु
Maharashtra Rain Update : काही जिल्ह्यात सतत पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून त्यामुळं काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.
Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यात सतत पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून त्यामुळं काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.
कणकवलीतील खारेपाटणमध्ये पूरजन्य परिस्थिती, शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे. खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुक नदीपात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. याचबरोबर खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे 5 फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले उभे पीक पाण्याखाली गेले आहे. खारेपाटण चिंचवली मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.
रायगड : वावलोटी आणि सुपेगाव गावात पाणी शिरले
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वावलोटी आणि सुपेगाव हे दोन्ही गावात पाणी शिरले आहे. वावटोली आणि सुपेगाव गावातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं आहे. कुंडलिका रिव्हर्सची रेस्क्यू टीम मुरुडकडे रवाना झाली आहे. मुरुड - आगरदांडा रस्तेमार्गावर पाणी साचल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुरुड तालुक्यात गेल्या २४ तासात ३४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे मुरूडनजीक नांदगाव, मजगाव, उसरोलीमध्ये पण पाणी भरले आहे.
Hingoli : ओढ्याच्या पुरात आईसह सात वर्षाचा मुलगा वाहून गेला, शोधकार्य अद्याप सुरु
रायगड जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, माथेरान, तळा भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन एसटी स्टॅंडच्या पुढे पुलाजवळ पाणी साचले. रोहा मुरूड मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कवळटे आदिवासी वाडी केलघर मार्गावर दरड कोसळली. दरडीमुळे माती- दगड रस्त्यावर आल्याने केलघर मुरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सिंधुदुर्ग : तिलारी, सुखनदी, निर्मला नद्यांना पूरस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिलारी, सुखनदी, निर्मला नदीला पूर येण्याची परिस्थिती आली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाणी पाण्याखाली गेली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका
पावसाचा जोर वाढत असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पाण्याचा धोका देखील वाढत आहे. सध्या या ठिकाणीहून व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला असून नागरिकांना देखील इशारा देण्यात आला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू केल्यानं राजापूर शहरा जवळून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आला आहे. पावसाच्या वाढत्या जोरासोबतच या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. दरम्यान, या नद्यांना आलेल्या पुराचा आणि पाण्याचा अंदाज घेत ब्रिटीशकालीन पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई - गोवा हायवेवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
ओढ्याच्या पुरात आईसह मुलगा गेला वाहून , हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील घटना
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने एका महिलेसह त्यांचा मुलगा वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली असून पती आणि चालक या घटनेत बचावले आहेत. रात्रभर शोधकार्य सुरू होते मात्र आई आणि मुलगा दोघांचेही मृतदेह मात्र अद्याप सापडले नाहीत. औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके पोटा येथील रामदास शेळके,वर्षा योगेश पडोळ,योगेश पडोळ व मुलगा श्रेयश पडोळ हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले.यावेळी चालक योगेशला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही.त्यांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी गेली नाही आणि इथेच योगेश पडोळ,वर्षा पडोळ,श्रेयश पडोळ हा सात वर्षाचा मुलगा तिघे उतरले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तिघेही पाण्यात वाहून गेले.रामदास शेळके,चालक योगेश यांना बाहेर काढण्यात यश आले.दरम्यान,तहसीलदार कृष्णा कानगुले,सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात आले मात्र अद्याप आई आणि मुलगा यांचा मात्र शोध अद्याप लागलेला नाही.