(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli : ओढ्याच्या पुरात आईसह सात वर्षाचा मुलगा वाहून गेला, शोधकार्य अद्याप सुरु
Hingoli : या घटनेत संबंधित महिलेचा पती आणि आणखी एक व्यक्ती बचावला आहे, पुरात वाहून गेलेल्या महिलेचा आणि तिच्या सात वर्षाच्या मुलाचा शोध सुरु आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात काल रात्री ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने एका महिलेसह तिचा सात वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. काल रात्री ही घटना घडली असून त्या महिलेचा पती आणि चालक बचावले आहेत. वाहून गेलेल्या दोघांचे शोधकार्य रात्रभर सुरु होते. मात्र अद्याप या दोघांचा शोध लागला नाही.
औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके पोटा येथील रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयश पडोळ हे चार जण एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी असोला मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालक योगेशला ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही. त्याने त्यातूनच गाडी काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी मध्येच अडकली. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या भागातील ओढ्यांना पूर आले आहेत.
गाडी पाण्यात अडकल्याने योगेश पडोळ, वर्षा पडोळ आणि त्याचा सात वर्षाचा मुलगा श्रेयश पडोळ तिघे उतरले. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तिघेही पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके यांना योगेश पडोळ यांना बाहेर काढण्यात यश आले. पण वर्षा पडोळ आणि त्यांचा मुलगा श्रेयस हे मात्र वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने त्या भागात शोधकार्य सुरु केलं. तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे या ठिकाणी भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला. वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा रात्री उशीरापर्यत शोध सुरु होता. आज सकाळपासून पुन्हा हे शोधकार्य सुरु करण्यात आले. मात्र अद्याप आई आणि मुलगा यांचा शोध लागला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update : वरुणराजा बरसला, शेतकरी सुखावला... राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी
- Coronavirus Today : देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नवे कोरोनाबाधित, देशाचा रिकव्हरी रेट 97.22 टक्क्यांवर
- Euro Cup Final : इटली दुसऱ्यांदा 'युरो कप' चॅम्पियन; अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर इंग्लंडचा पराभव