सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज 12 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा साधारण 9 अंशांवर आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली आहे. काही दिवसांपूर्वी निफाडमधे किमान तापमानाचा पारा 5 अंशावर गेला होता. नाशिक, अहिल्यानगर,जळगाव या शहरांमध्ये निचंकित तापमानाचा नोंदी होत असून महाराष्ट्रभर गारठा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान काहीसे वाढले होते. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पुढील 24 तासात महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. (Temperature Update)
थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज 12 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा साधारण 9 अंशांवर आहे.
IMD Forecast: हवामान खात्याचा अंदाज काय?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून येत्या 24 तासात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 7 ते 9 अंशावर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 5 दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.
सध्या उत्तरेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाबमध्ये तापमानाचा पारा 5 अंशांवर गेलाय. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर या राज्यांना हवामान विभागाचे थंडीचे इशारे आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची ही शक्यता आहे.
आज कुठे किती पारा?
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, नगर, मालेगाव, जेऊर या भागांमध्ये सध्या 10 अंशापेक्षा कमी तापमान आहे. मराठवाड्यात धाराशिव 10 अंशावर गेले तर परभणी 11 अंशावर आहे. पुढील 24 तासात तापमान दोन ते तीन अंशाने कमी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे.
अहिल्यानगर: 9.3
छत्रपती संभाजीनगर - 12
जळगाव 9.7
कोल्हापूर 15.3
महाबळेश्वर 12
नाशिक 9.5
धाराशिव 10.4
परभणी 11
सांगली 13.2
सातारा 12.1
सोलापूर 13.8
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. तर नाशिक आणि जळगावमध्ये शीतलहरींचा फटका नागरिकांना बसू शकतो. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह काही भागांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, किमान तापमान 9 ते 11 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.























