Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्वाची बातमी; 2023 पर्यंत पूर्ण होणार काम, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची माहिती
Mumbai-Goa Highway : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 90 टक्के काम पूर्ण झालं असून उरलेलं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिली.
Mumbai-Goa Highway : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) कालपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) पाहणी दौऱ्यावर आहेत. रायगड (Raigad) पासून सिंधुदुर्गपर्यंतचा (Sindhudurg) मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा तपशील घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करून आज सिंधुदुर्ग दाखल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर कुडाळ मधील एमआयडीसी रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांशी तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शिल्लक कामात संदर्भात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.
90 टक्के काम पूर्ण झालं
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 90 टक्के काम पूर्ण झालं असून उरलेलं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच रत्नागिरी आणि रायगड मध्ये अडकलेलं काम लवकरच पुरवत सुरू करू आणि या मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. परशुराम घाट किंवा मुंबई गोवा मार्ग असणाऱ्या घाटमार्गांमध्ये धीम्या गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात उत्तरांचल किंवा ज्या ठिकाणी डोंगराळ भागात काम झालेले आहेत, त्या ठिकाणच्या समिती येऊन पुढील महिन्याभरात रिपोर्ट देतील आणि त्यानुसारच या घाटमार्गातील काम होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
आमदार राजन साळवींच्या भेटीने चर्चांना उधाण
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. यावेळीच पत्रकारांनी रवींद्र चव्हाण यांना राजन साळवी हे कशाकरिता भेटले? यावर बोलताना त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात तसेच बारसू रिफायनरी होण्यासंदर्भात ते सकारात्मक असल्याची चर्चा झाल्याची माहिती दिली. मात्र पत्रकारांनी त्यांना भाजप प्रवेशा संदर्भात विचारलं असता, त्या संदर्भात बोलण्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी टाळलं.