Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट...मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Maharashtra School close : हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर मुंबई, रत्नागिरी आणि चंद्रपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.
![Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट...मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर Maharashtra rain updates Weather forecast school and colleges will be closed in Mumbai Ratnagiri Chandrapur amid red alert of heavy rain Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट...मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/26/e6b1b43aa12a187d3235e99e9725b6a31690386431346290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Rain Update : राज्यातील विविध जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडसह इतर जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आता परिपत्रक काढून जिल्ह्यातील पहिली ते 12 वी च्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे सर्व महाविद्यालय बंद राहणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला आज रात्री 8 ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईकरांनी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.
पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून उद्या ऑरेंज अलर्ट आहे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू राहतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तर, ठाण्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.
रत्नागिरीत सुट्टी जाहीर
हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना गुरुवार, 27जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 27 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रपूरमध्ये सुट्टी जाहीर
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उद्या म्हणजे 27 जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती व अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
इतर संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)