Mumbai Rains: मुंबईत आज सकाळपासूनच संततधार...मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा इशारा
Mumbai Rain Updates: मुंबईत आज सकाळपासून पावसाचा जोर दिसून आला. येत्या काही तासांत मुंबईत मुसळधार पवासाचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Rains: मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी (Mumbai Rains) लावली. आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबईकरांच्या मनात 26 जुलै 2005 च्या आठवणी जाग्या झाल्या. मुसळधार पावसातही सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई लोकल ट्रेन वाहतूक सुरळीत सुरू होती. तर, काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. हवामान विभागाने मुंबईसाठी आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज सायंकाळपर्यंत कुलाबामध्ये 83 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 41.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर,विलेपार्ले,सांताक्रूझ,वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले होते. परिणामी काही वेळेसाठी दोन ते तीन वेळेस सबवे मधील वाहतूक बंद करण्यात आली होती. सबवे मधील पाण्याचा निचरा झाल्यानंतर तातडीने वाहतूक सुरू करण्यात आली. अंधेरी पूर्व ते पश्चिमला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग असलेल्या अंधेरी सबवे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र होते.
मुंबई पूर्व उपनगरात पावसाची सकाळ पासून रिपरिप सुरू आहे. सायंकाळी लोकांची कामावरून घरी परतण्याची वेळ झाली असताना पावसाचा जोर वाढला आहे. सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत तरी सखल भागात पाणी साचले नसल्याचे वृत्त होते. कुर्ला, घाटकोपर, भांडुप , मुलुंड, चेंबूर , गोवंडी या सगळ्याच विभागात जोरदार पाऊस बरसत आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण ओवरफ्लो
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण आज पहाटेच्या सुमारास ओवर फ्लो झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने तानसा धरणाच्या खाली आणि तानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तहसीलदार पोलीस व महानगरपालिका यांना सतर्क राहण्याचे देखील सांगण्यात आले आहे. तानसाच्या पाण्यामुळे तानसा, शहापूर, भिवंडी, वसई तालुक्यातील अनेक गावांना फटका बसतो. त्यामुळे या भागात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात पैकी चार तलाव भरले आहेत. सध्या तलावातील एकूण पाणीसाठा हा 55 टक्क्यांच्या आसपास पोहचला आहे.