Maharashtra Rain : आज कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे.
रत्नागिरी पाऊस
काही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा रत्नागिरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही गावात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. तर खेड, दापोलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत.
सिंधुदुर्ग पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्रात वादळ सदृढ परिस्थिती निर्माण झाली आहे. ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळं लोणी-संगमनेर रस्ता जलमय झाला आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप, तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानातही पाणी शिरले आहे. गावातील माणिकनगरमध्ये पाणी घुसले आहे. जनावरांच्या बाजाराजवळील भीमनगरमध्येही पाणी शिरलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या: