(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur Rain : लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस, पिकं वाहून जाण्याची वेळ, शेतकरी चिंतेत
लातूर (Latur) जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
Latur Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल रात्री झालेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे. लातूर शहरालगत असलेल्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचे नुकसान झालं आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या तुफान पावसामुळं पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिकं वाहून जाण्याची वेळ आली आहे.
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथचे रहिवासी केशव माळी यांनी शहरालगत दहा एकर शेती कसायला घेतली आहे. यावर्षी जून महिन्यामध्ये त्यांनी 10 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, रोगराईमुळं शेतीवर नांगर फिरवावा लागला होता. त्यावेळी त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झालं होतं. पुन्हा नव्या जोमानं त्यांनी चार लाख खर्च करत टोमॅटोची शेती उभी केली होती. काही दिवसात उत्पादन सुरु होणार होतं. मात्र, काल झालेल्या तुफान पावसानं टोमॅटोची शेती पूर्णपणे वाया गेली आहे. काही महिन्याच्या फरकात सतत होणाऱ्या नुकसानामुळं केशव माळी यांच्यासारखे अनेक शेतकरी सध्या हतबल झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसानं चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर पावसानं महिनाभर उघडीप दिली होती. मात्र, आता पुन्हा जोरदार पावसानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
जी परिस्थिती लातूर शहरालगतच्या शेतकऱ्यांची आहे अशीच स्थिती औसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. ज्या शेतातून पाण्याला वाट नाही अशा ठिकाणी शेतीचं खूप नुकसान होत आहे. निसर्गाच्या माऱ्यामुलं बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसामुळं लातूर शहरातील सखल भागांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. राजीव गांधी चौकाच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले होती. शाहूपुरी कॉलनीमध्ये तर 20 ते 25 घरांमध्ये पाणी शिरलं होतं. गौराईची सजावट केलेल्या घरात पाणी शिरल्यामुळं महिला वर्गाची धावपळ झाली. ज्या घरामध्ये पाणी शिरल आहे त्यांच्या संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: