Aaditya Thackeray : मुख्यमंत्री पदाबाबत विचारल्यानंतरही शिंदेंचं बंड, बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती, असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं.
Aaditya Thackeray : तिथे गेलेले 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे खातं असतं ते खातं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मग त्यांना कमी काय केलं असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती. त्यानंतरही त्यांनी 20 जूनला बंड केल्याचे ठाकरे म्हणाले. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली. सांताक्रूझमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. आसाममध्ये एकीकडे पूर आला आहे. तिथे लोकांना संरक्षण द्यायला हवे होते. पण हे संरक्षण बंडखोरांना दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायची त्यांची लायकी नाही. असती तर तुम्ही बंड करुन सूरतला गेला असता का असेही ते म्हणाले. खरोखर यांच्यात ताकद, लाज स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केलं असतं. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही म्हणून सूरतला पळाले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत उठून एका शेतकऱ्यानं मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोललो. त्यानंतर संदीपान भुमरे यांना मंत्रीपद दिल्याचा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान, धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: