(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर...
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांनी दहिसर येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांवर बोचऱ्या शब्दात टीका केली.
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : तुम्ही एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्यावे, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडल्यास शिवसैनिक झेंडा खिशात ठेवतील आणि त्याचा दांडा वापरतील असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना बंडखोरांना इशारा दिला. शिवसेनेला बंड नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने असे अनेक बंड पचवले असल्याचे सांगितले.
संजय राऊत यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गुलाबराव पाटील हे पान टपरी चालवत होते. संदीपान भुमेर हे साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यांनी शिवसेनेने आमदार केले, कॅबिनेट मंत्री केले असल्याचे सांगितले. आज त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. हे शिवसेनेवर संकट नाही तर ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
गुवाहाटीमध्ये एक मंदीर आहे. त्या ठिकाणी रेड्यांचे बळी देतात. आम्ही 40 रेडे पाठवले असल्याचे उपरोधिकपणे राऊत यांनी म्हटले.
किरीट सोमय्या काय करणार?
संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. सोमय्या दररोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव, यामिनी जाधव यांना तुरुंगात पाठवणार असल्याचे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी ईडीचे प्रकरण मिटवले असून आपण सुरत जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितल्याचेही राऊत यांनी म्हटले. माझ्यावर ईडीची कारवाई झाली. राहते घर, वडिलोपार्जित जमीन जप्त करण्यात आली. लहान मुलींवर ईडीची कारवाई झाली. मात्र, आम्ही गुडघे टेकले नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
राऊतांची जीभ घसरली
गुवाहाटीतून येणाऱ्या 40 बॉड्या आम्ही थेट शवागारात पाठवणार असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.