'महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काम करतात', महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अर्णब गोस्वामींच्या अटकेचं स्वागत
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक हा काळा दिवस असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तर अनेकजण अर्णब गोस्वामींवर करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत आहेत.
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण अर्णब गोस्वामींवर करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत आहेत. अनेकांनी अर्णब यांना झालेल्या अटकेचा निषेध केला आहे. तर अनेकांना कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, कायदा सगळ्यांना सारखाच, असं म्हणत अर्णब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक हा काळा दिवस असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तर महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असं विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : पोलिसांकडे पुरावे असतील म्हणून कारवाई : संजय राऊत
महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, "इथे कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीही कोणावर अन्याय करत नाहीत, सूडाने कारवाई करत नाहीत. या संदर्भात पोलिसांच्या हाती काही पुरावे, धागेदोरे सापडले असतील. ही कारवाई पोलिसांनी केली आहे. त्या कारवाईचा सरकार किंवा एखाद्या पक्षाशी संबंध असल्याचं कोणतंही कारण नाही."
महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काम करतात : अनिल देशमुख
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, 'महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे काम करतात. आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. अन्वय नाईक यांच्या पत्नीने केस रिओपन करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली आणि कोर्टाने त्यांना ती परवानगी दिली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.'
मागील सरकारने हे प्रकरण दाबलं कसं? याची चौकशी होणं गरजेचं : अरविंद सावंत
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 'केंद्रीय गृहमंत्र्यांचा आदर राखून एक प्रश्न मला त्यांना विचारायचाय की, हा मुळात माध्यम स्वातंत्र्यावरचा हल्ला कसा हे त्यांनी मला सांगावं. अन्वय नाईकांच्या नातेवाईकांच्या सततच्या तक्रारी येत असतानाही मागील सरकारने हे प्रकरण दाबलं कसं? याची चौकशी करणं गरजेचं. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख नसतानाही, त्यांचं कोणतंही स्टेटमेंट न घेता ही केस बंद करण्यात आली होती. अन्वय नाईकांचे कुटुंबिय सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत. ही न्यायिक प्रक्रिया याचा अर्णब यांच्या वैयक्तिक आयुष्याशी कोणताही संबंध नाही. हे प्रकरण क्रिमिनल प्रोसिजरच्या अंतर्गत येतं, त्याचा आणि माध्यम स्वातंत्र्याचा कोणताही संबंध नाही.'
ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय.#समर्थनकायद्याचे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 4, 2020
...हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य : जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली, अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय.'
रिपब्लिक टीव्हीची बाजू
आज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.
हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफटत नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही.
"मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली.
सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली."
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे.
एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं.
सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे.
आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही."
महत्त्वाच्या बातम्या :
- 'ही अघोषित आणीबाणी', अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात
- कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Arnab Goswami Arrest | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
- 'सोनियासेना किती तोंडं बंद करणार?', अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगना
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, आमच्याकडून चूक झाल्यास कायदा आम्हालाही सोडणार नाही : संजय राऊत