(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arnab Goswami Arrest | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर करुन पोलीस त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत.
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सकाळी काय घडलं? आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना अलिबागला घेऊन गेले.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्वीट केलं आहे. "काही काळापूर्वी इंडियाज मोस्ट वॉण्टेड नावाचा शो होता आणि अँकर हत्या, आत्महत्या या मुद्द्यावर भाष्य करत असे. पण याच अँकरला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2 आहे. दुसरा अँकर तेच करतोय, आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Once upon a time there was a show called India's Most Wanted & the Anchor highlighted murders & suicides, the same anchor was held responsible for his wife's murder. Here is Part 2 of India's Most Wanted, another anchor doing the same is now responsible for suicide#ArnabArrested
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 4, 2020
महाराष्ट्र सरकार किती जणांचे आवाज दाबणार : कंगना रनौत अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार आणखी किती जणांचा आवाज दाबणार, असा सवाल तिने व्हिडीओ पोस्ट करुन विचारला आहे.
रिपब्लिक टीव्हीची बाजू आज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफटत नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही. "मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली." मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे. एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे. आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही." गोस्वामींच्या अटकेचा एनबीएकडून निषेध ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे, त्याचा एनबीएने निषेध केला आहे. NBAने निवेदनात म्हटलं आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोस्वामी यांना आत्महत्येप्रकरणी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. एनबीए गोस्वामींच्या पत्रकारितेच्या शैलीचं, पद्धतीचं समर्थन करत नाही. मात्र ज्या पद्धतीनं त्यांना अटक झाली ते अयोग्य आहे. मीडिया कायद्यापेक्षा मोठा नाही, परंतु अटक करताना योग्य प्रक्रिया होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही अपील करतो की गोस्वामींना योग्य पद्धतीने वागणूक मिळावी. प्रामाणिकपणाने आणि सरकारच्या शक्तीचा दुरुपयोग होऊ नये, असं एनबीएने म्हटलं आहे.Message for Maharashtra government @republic #Arnab #ArnabWeAreWithYou #ArnabGoswami pic.twitter.com/AJizRCitS7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 4, 2020