महिला आयोगाची ठाण्यात आढावा बैठक, एकाचवेळी 174 महिलांनी नोंदवल्या तक्रारी
Thane News: राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात जनसुनावणी पार पडली.
Thane News: गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहे. अशातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांनी दिली आहे. महिला आयोगाकडून (Women Commission) ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचं चाकणकरांनी म्हटले आहे.
राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीनंतर माध्यमांना माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसुनावणीच्या निमित्ताने एकूण 174 तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 116 कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. सामजिक समस्या 18, मालमत्ता संबधीत 09, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार 05 आणि इतर 26 अशा एकूण 174 तक्रारी आल्या होत्या. राज्यात फिरताना आढाव घेणारा हा माझा 24 वा जिल्हा असून, या 24 जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याचं चाकणकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यात कौटुंबिक समस्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.
वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला
पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, जनसुनावणीवेळी आलेल्या तक्रारीचं जागच्या जागी नीपटारा करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. आज झालेल्या जनसुनावणीवेळी 5 पॅनल तयार करून एकाच वेळी एकूण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तसेच यावेळी वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला आल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.
महिलांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध...
दरम्यान, यावेळी बोलताना, फक्त पुणे जिल्हाच नव्हे तर राज्यातच गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी आपण टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. ज्यात 112, 110 आणि 191 टोल क्रमांकांचा समावेश आहे. मात्र याबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती झालेली नाही. तर महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनासह नागरिक म्हणून आपली सर्वांची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचं चाकणकर म्हणाल्यात.
इतर महत्वाच्या बातम्या :