(Source: Poll of Polls)
मार्च महिन्यात राज्यातील रोज 70 मुली बेपत्ता, तीन महिन्यात 5,610 मुली बेपत्ता; लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल
Maharashtra Crime : नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचं समोर आलं आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये 18 ते 25 वयोगटातील संख्या मोठी आहे.
Maharashtra Missing Girls news : एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज 70 मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली असून ही आकडेवारी गंभीर आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 18 ते 25 या वयोगटातील अधिक आहे. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, राज्यातील 5,610 मुली बेपत्ता झाल्याचं स्पष्ट आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023
बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींच्या आकडेवारीचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. त्यांची नोंद अपहरणाच्या केसमध्ये केली जाते. तर 18 वर्षावरील मुली आणि महिला बेपत्ता झाल्यास, तशी तक्रार आल्यास पोलिसामध्ये त्याची नोंद केली जाते. काही पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.
महत्त्वाचं म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2258 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिमधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
राज्यातील बेपत्ता मुलींच्या वाढत्या संख्येवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते हे चिंताजनक आहे. 2020 पासून महाराष्ट्र हरवलेल्या महिलांच्या बाबतीत नंबर एकला आहे. आम्ही राज्य महिला आयोगाच्यावतीनं वारंवार पाठपुरावा करत आहोत. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. गृहमंत्र्यांना विनंती आहे की यांचा शोध घ्यावा. राज्यातील मिसींग सेलचा आढावा घेऊन सूचना द्याव्यात.
ही बातमी वाचा: