Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडची अभिनेत्री, प्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झालंय.

Sulakshana Pandit Passes Away: कधीकाळी बॉलिवूड (Bollywood News) गाजवून सोडणारी अभिनेत्री (Actress) आणि आपल्या आवाजाची जादू दाखवून प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालंय. सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना मुंबईतील (Mumbai News) नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलेलं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला कायमचं अलविदा म्हटलं. सुलक्षणा पंडित म्हणजे, अभिनेत्री विजेता पंडित (Vijayta Pandit) आणि संगीतकार जोडी जतिन-ललित (Jatin-Lalit) यांची बहीण.
गायिकेचे भाऊ ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ललित यांनी सांगितलं की, त्यांची बहीण सुलक्षणा पंडित यांचं 6 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) निधन झालं. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांचे अंत्यसंस्कार होतील. या वृत्तानं हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi Film Industry) शोकाकळा पसरली आहे.
सुलक्षणा पंडित यांचं निधन
सुलक्षणा पंडित यांनी केवळ चित्रपटांमध्येच आपली ओळख निर्माण केली नाही, तर त्यांच्या गाण्यानंही मनं जिंकलीत. 1954 मध्ये जन्मलेल्या सुलक्षणा पंडित एका संगीतमय कुटुंबातून आल्या होत्या. त्यांचे काका प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज होते. त्यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत, ज्यांपैकी जतिन-ललित हे भाऊ पुढे प्रसिद्ध संगीतकार झाले.
सुलक्षणानं वयाच्या नवव्या वर्षी तिचा संगीत प्रवास सुरू केला. तिनं 1967 मध्ये पार्श्वगायन सुरू केलं. 1975 मध्ये, त्यांना 'संकल्प' चित्रपटातील 'तू ही सागर है तू ही किनारा' या गाण्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी अभिनयात आपलं नशीब आजमावलं. 1970 आणि 1980 च्या दशकात, ती 'उलझन', 'संकोच', 'अपनापन' आणि 'हेरा फेरी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिची कारकीर्द अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात भरभराटीला आली, पण नंतर त्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात आव्हानांचा सामना करावा लागला.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, सुलक्षणा पंडित यांनी कधीही लग्न केलेलं नाही. त्यांच्या आणि अभिनेता संजीव कुमार यांच्यात काहीतरी होतं, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की, 6 नोव्हेंबर म्हणजे, संजीव कुमार यांची पुण्यतिथी. आता, या दिवशी, सुलक्षणानंही जगाचा निरोप घेतला. तिला आरोग्य समस्या आणि आर्थिक आव्हानांचाही सामना करावा लागला. तिचं जाणं हे चित्रपट आणि संगीत उद्योगासाठी एक मोठं नुकसान आहे. तिचा मधुर आवाज तिच्या चाहत्यांना नेहमीच लक्षात राहील.























