(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Fire : नाशिक आगीच्या घटनांनी हादरले, एकाच दिवसांत तीन ठिकाणी 'आग हीं आग'
Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरासह जिल्हा आगीच्या (Fire) घटनांनी हादरला असून शहरात दोन तर सिन्नरमध्ये एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे.
Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरासह जिल्हा आगीच्या (Fire) घटनांनी हादरला असून शहरात दोन तर सिन्नरमध्ये एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे. यात आगीच्या घटनांत दोन जण भाजले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय दोन तीन कुटुंबाचे संसार बेचिराख झाले आहेत. त्यामुळे आगीच्या घटना नाशिकमध्ये नित्याच्या झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) शहरात पाणी गरम करत असतांना अचानक सिलेंडरचा (Cylender Blast) स्फोट झाल्याने पती-पत्नी गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. या घटनेत जयश्री विक्रम आवारे व विक्रम किरण आवारे हे गंभीर भाजले असून त्यांना खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही 70 टक्क्यापेक्षा जास्त भाजले असून त्याचवेळी घरातील दुसऱ्या खोलीत असणारा भावेश हा 04 वर्षीय बालक सुदैवाने बचावला आहे. त्याला कुठलीही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. शिवाय स्थानिक रहिवाशांनी घरातील इतर सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने पुढील घटना टळली.
नाशिक शहरात परिसरात असलेल्या फकीरवाडी झोपडपट्टीमध्ये झोपडी वजा पत्र्याच्या घरात आगीचा भडका उडाला. अग्निशामन दलाला माहिती मिळताच तातडीने बंब घटनास्थळी पोहोचले. अरुंद गल्लीबोळातून वाट काढत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. मात्र या आगीत दोन घरे जळून खाक झाली असून त्याच्याबरोबर एका मांजरीसह तिच्या लहान पिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आजूबाजूच्या रहिवाशांनी पेटलेल्या घरांवर पाणी फेकण्यास प्रारंभ केला.तसेच या घराला लागून असलेल्या उंच घरापर्यंत रहिवाशांनी सुद्धा प्रसंगावधान राखून सिलेंडर बाहेर काढले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले
तसेच तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी शालिमार- हावडा एक्सप्रेसला भीषण आग लागली होत. या आगीत लगेज बोगीतील सगळे सामान बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आज पुन्हा नाशिकरोड येथील पवारवाडी परिसरात असलेल्या भगवती लान्स जवळ एका गोदामास आग लागल्याची घटना घडली. गोदाम असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले होते. मात्र परिसरातील नागरिकांच्या समय सुचकतेमुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
आगीच्या घटनांचे वाढते प्रमाण
दरम्यान नाशिक शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आगीच्या घटना वाढत आहेत. येथील दाटलोकवस्ती, अरुंद रस्ते, गल्लीबोळ यामुळे आग विझवण्यात अनेकदा अडचणी येतात. शिवाय आग लागल्यानंतर दाट लोकवस्तीमुळे आग यापसरत जाते. शिवाय एकमेकांना लागून असल्याने सिलेंडरचा भडका उडून आग भीषण होत जाते. परिणामी बंब येईपर्यंत आग रौद्र रूप धारण करते. त्याचबरोबर अरुंद गल्लीबोळांमुळे आग विझवण्यासाठी त्रासदायक ठरते. यामुळे आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलास पाचारण करून तसेच घरातील सिलेंडर बाहेर काढणे महत्वाचे ठरते.