Buldhana Ghatmandni : बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर; पुन्हा अवकाळी आणि अतिवृष्टी
Buldhana Bhendwal Bhavishyavani 2023 : संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे.
Buldhana Ghatmandni : संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2023) भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज आज वर्तवण्यात आले आहे. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. तर राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमके काय काय अंदाज यावर्षभराचे असतील पाहूया....
पावसाबाबत अंदाज
- जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल
- जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
- ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल
- सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल
- पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल
पीक पाण्यासंबंधीचे अंदाज
- यावर्षी पिकांवर रोगराई राहिल
- कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल
- ज्वारी सर्वसाधारण राहिल
- तूर पीक चांगले असेल
- मूग पीक सर्वसाधारण असेल
- उडीद मोघम सर्वसाधारण
- तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल
- बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
- तांदुळाचं चांगलं पीक येईल
- गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल
- हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल
देशासंबंधीचे अंदाज
- संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील
- देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल
राजकीय अंदाज
- राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.
- राजकीय उलथापालथ होत राहिल
- नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल
काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.
भेंडवळची घटमांडणी म्हणजे निव्वळ पोपटपंची
एकीकडे राज्यभरात भेंडवळची घटमांडणीची चर्चा होत असताना, दुसरीकडे मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याला विरोध करण्यात आला आहे. भेंडवळची घटमांडणी म्हणजे निव्वळ पोपटपंची आहे. त्यामुळे ही घटमांडणी फक्त ठोकताळे असतात, राज्यातील शेतकऱ्यांनी या भेंडवळच्या घटमांडणीवर कुठलाही विश्वास ठेवू नये, भेंडवळच्या घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)