नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर अशोक मुर्तडक हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नाशिक (Nashik News) दौऱ्यावर येणार आहे. महाविकास आघीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. या सभेवेळी नाशिकमधील अनेक बडे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता ठाकरे ठाकरे गटाने नाशिकमध्ये मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
अशोक मुर्तडक ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
राज ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर अशोक मुर्तडक हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा असून या सभेमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक हे प्रवेश करणार, अशी माहिती त्यांनी दिली आहे. अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष महापौर होते. अशोक मुर्तडक यांच्या प्रवेशाने नाशिक पूर्वची महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या अशोक मुर्तडक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यकर्त होते. अशोक मुर्तडक मनसेला सोडून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विक्रम नागरे, पवन पवारांचा पक्ष प्रवेश होणार?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज भाजपचे विक्रम नागरे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे देखील प्रवेश करणार आहेत. विक्रम नागरे यांनी नाशिक पश्चिमच्या भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विक्रम नागरे यांच्या पक्ष प्रवेशाने ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तर पवन पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीला नाशिकमध्ये फायदा होईल, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, विक्रम नागरे आणि पवन पवार यांना नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता या दोघांचा आज ठाकरे गटात प्रवेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा