Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यातच आमनेसामने आले.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काल नाशिक पूर्व विधानसभा (Nashik East Assembly Constituency) मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. या पाठोपाठ आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nashik West Assembly Constituency) भाजप (BJP) आणि ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राडा
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजपकडून विद्यमान खासदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर मनसेकडून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच आज भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सावतानगर परिसरात राडा झाला. स्लिप वाटपातून सुरु झालेल्या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. यात एकजण जखमी झाल्याचेही समजते. यानंतर अंबड पोलीस ठाण्याबाहेर बडगुजर आणि हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुंडगिरी चालणार नाही : पंकजा मुंडे
या राड्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सीमा हिरे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधाला. त्यांनी म्हटलं की, ही घटना गंभीर आहे. गुंडगिरी चालणार नाही. प्राणघातक हल्ला झाला, मी यावर पोलिसांना लक्ष घालण्याचे सांगितले. एक महिला उमेदवार असताना ही घटना घडली त्याचा निषेध आहे. प्राणघातक हल्ला केला त्याचा गुन्हा दाखल केला आहे, पोलिस चौकशी करत आहे. ही निवडणूक सुरू असताना अशा घटना घडता. भरारी पथकांना मी विनंती करते की, बॅगा तपासा, मात्र अशा घटनांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. त्यांच्याही कार्यकर्त्यांवर हल्ले झाले पण सध्या आचारसंहिता चालू आहे. आमची निवडणूक विकासावर सुरू आहे. आमचे संस्कार हे जातीवर निवडणूक लढवणे नाही, असे त्यांनी म्हटले.
ढिकले-गीतेंच्या समर्थकांमध्ये बाचाबाची
दरम्यान, काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केला. तर गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्या फोडल्या, असा आरोप केला. हे प्रकरण देखील पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या राड्यानंतर पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते.
आणखी वाचा